Home » ५ जानेवारी १६६४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर केलेल्या लढाईमुळेच आधुनिक मुंबईचा जन्म झाला…
History

५ जानेवारी १६६४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवर केलेल्या लढाईमुळेच आधुनिक मुंबईचा जन्म झाला…

मायापुरी, मुंबई नगरी, मुंबापुरी या नावाने ओळखली जाणारी महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणजे महाराष्ट्राचा जणू काही श्वास आणि अस्मिताच आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे व महाराष्ट्राच्या व एकंदरीतच देशाच्या राजकीय ,सामाजिक,आर्थिक व मनोरंजन क्षेत्राशी निगडित सर्वच महत्त्वपूर्ण घडामोडी या मुंबईतच घडतात .मुंबई ही भारताच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू नेहमीच राहिली आहे. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर मुंबई नक्की कुणाची यातील वाद हे वेळोवेळी निर्माण झाले.मुळातच आधुनिक मुंबई निर्मितीची कथा ही आपल्याला अगदी छत्रपती शिवरायांच्या काळा मध्ये घेऊन जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची आधुनिक मुंबईच्या स्थापनेमधील नक्की काय भूमिका होती हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपण बालपणापासूनच नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यामधील थरारक घटना ऐकत आलो आहे. मंग तो लालमहाल वर केलेला धाडसी हल्ला किंवा आग्र्याहून केलेली स्वतःची सुटका.यापैकीच एक म्हणजे सुरतेची लूट.छत्रपती शिवाजी महाराज यांनी दोनदा सुरतची लूट केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची सुरतेवरील स्वारी खूपच महत्वपूर्ण ठरली होती. शिवाजी महाराजांनी ५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेवर लढाई केली व त्यावेळी मोगल दरबारातील इनायत खान हा सुरतचा कारभार पाहत होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई नंतर तो सुरते सोडून पळून गेला.सुरतेवर स्वारी करण्याचा महाराजांचा मुख्य उद्देश हा त्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करणे हा नव्हता तर सुरते सारख्या धनाढ्य बाजारपेठा असलेल्या भागातून नित्यनेमाने छत्रपती शिवाजी महाराजांना काही आर्थिक रक्कम या ठिकाणाहून मिळावी अशी तरतूद करायची होती.

महाराजांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आर्थिक नियोजन हे खूपच उत्कृष्टपणे केले होते. आपल्या प्रजेच्या,सैन्याच्या सर्व गरजा भागवल्या जातील इतकी साधन सामग्री ही नेहमी त्यांच्या खजिना मध्ये असेल.मुघलांच्या नजरेतून ही गोष्ट निसटली मात्र त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्या व्यापाराचे केंद्र असलेल्या वखारी वसवल्या होत्या.या वखारीच्या ठिकाणी सर्व आर्थिक व व्यापारी व्यवहार होत असत.

ब्रिटिशांना ही गोष्ट तात्काळ कळली की शिवाजी महाराजांना सुरते मधून नियमित तत्त्वावर आर्थिक उत्पन्न हवे आहे व त्यामुळे सुरतेवर वारंवार अशा लढाया होतच राहणार म्हणूनच ब्रिटिशांच्या अखत्त्यारीत असलेली वखार एखाद्या अन्य ठिकाणी हलवणे गरजेचे आहे ही गोष्ट सुद्धा त्यांच्या लक्षात आली. त्यावेळी मुंबईचा समुद्र किनारा व एकंदरीतच मध्यवर्ती ठिकाण हे नौदलाच्या दृष्टीने व व्यापाराच्या दृष्टीने खूपच अनुकूल होते म्हणूनच ब्रिटिशांनी आपली सुरत मधील वखार मुंबईमध्ये हलवण्याचे ठरवले.

मात्र त्यावेळी मुंबई हे बेट पोर्तुगिजांच्या ताब्यात होते.ब्रिटिश राजघराण्याला यासंदर्भात कळविण्यात आले. त्यावेळी पोर्तुगिजांची राजकन्या लोना कॅथरिन ही दिसण्यास फारशी सुंदर नसल्यामुळे तिच्या विवाहास अडचणी येत होत्या.तिच्या विवाहाच्या मोबदल्यात पोर्तुगीज राजघराण्याने भली मोठी रक्कम देण्याचा विचार केला होता हे समजल्यावर ब्रिटिश राजघराण्याने कॅथरीनचा विवाह ब्रिटिश राजघराणे मध्ये करून घेऊन त्याच्या बदल्यात भारतामधील बेटे मागितली व मुंबई अशा प्रकारे ब्रिटिशांना मिळाल्यावर त्यांनी सुरत ची राजधानी मुंबईला हलवली.

ब्रिटिशांनी मुंबई आपल्या ताब्यात घेतल्यानंतर याठिकाणी आधुनिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवली.सर्वात प्रथम ब्रिटिशांनी व्यापाराच्या दृष्टीने व समुद्राने वेढलेल्या मुंबईला संरक्षण देण्यासाठी न्याय व्यवस्था,कायदे व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था यांना बळकट केले.मुंबईमध्ये आधुनिक पोलीस दलाची स्थापना केली व या ठिकाणी स्थानिक भंडारी लोकांना मोठ्या प्रमाणात पोलिस दलात रुजू करण्यात आले.मुंबईमधील माजगाव डॉक येथे नौदलाची स्थापना करण्यात आली.

तसेच मुंबई मध्ये दोन प्रकारची न्यायालय सुद्धा स्थापन करण्यात आली.अशा प्रकारे आधुनिक शहरांमध्ये आवश्यक असलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पायाभरणी ब्रिटिशांनी मुंबईमध्ये करून खऱ्या अर्थाने आधुनिक मुंबईला जन्म दिला.कायदा व सुव्यवस्था नियंत्रित केल्या नंतर सुरत मधील धनाढ्य व्यापाऱ्यांना ब्रिटिशांनी मुंबई मध्ये येऊन स्थायिक होण्यास सांगितले व त्यानंतर या ठिकाणी आधुनिकीकरणाच्या अनेक योजनांना राबवले गेले.

या ठिकाणी सांगण्याचे प्रयोजन हेच आहे की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर इतकी महत्त्वकांक्षी ल ढाई केली नसती तर ब्रिटिशांनी सुरत मधून मुंबईला आपला पळ ठोकला नसता व मुंबईला आज जे आधुनिक रूप प्राप्त झाले आहे ते प्राप्त झाले नसते.