अहमदनगर शहराविषयी माहित नसलेल्या काही गोष्टी, कोण आहे अहमदनगर शहराचे संस्थापक? जाणून घ्या सविस्तर

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या काही शहरांच्या स्थापनेपासून चा घटनाक्रम हा अंगावर स्फुरण निर्माण करणारा असतो व त्याचा अभिमान ही बाळगला जातो.भारतावर झालेल्या निरनिराळ्या परकीय आक्रमणांचे साक्षीदार असलेले अहमदनगर हे शहर त्यांपैकीच एक होय.अहमदनगर शहराचा स्थापना दिवस 28मे 1490हा आहे.या दिवशी अहमदनगर शहराची स्थापना मलिक अहमद निजामशहा याने केली.28मे 2020 रोजी अहमदनगर शहराच्या स्थापनेला 530वर्षे पूर्ण होतील.यानिमित्ताने अहमदनगर शहराच्या स्थापनेचा इतिहास काही तथ्यांच्या आधारे आपण जाणून घेऊया.

28मे 1490 रोजी मलिक अहमद निजाम शहा आणि जहाँगीर खान यांच्यामध्ये सत्तेसाठी एक महत्त्वपूर्ण लढाई लढली गेली.या लढाईत मलिक  अहमद निजामशहाने गनिमी काव्याने अतिशय शिताफीने जहाँगीर खानला पराभूत केले व या विजयाच्या दिवशीच अहमदनगर शहराच्या स्थापनेची घोषणा केली.

अहमदनगर शहराची स्थापना करणारे मलिक अहमद निजाम शहा हे मूळचे महाराष्ट्र ातील होते.महाराष्ट्रातील परभणी जवळ असलेले पाथरी हे त्यांचे गाव होय. प्रथम विजय नगर कडे चाकरीच्या शोधार्थ निघाले असताना मलिक अहमद निजामशहा यांच्या वडिलांना बहमनी राज्याकडून पकडले गेले व त्यांना तेथे गुलाम म्हणून ठेवण्यात आले. मात्र आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मलिक अहमद निजामशहा यांचे वडील सरदार या पदावर गेले व नंतरच्या काळात ते वजीर सुद्धा बनले होते .बहमनी राज्यांमध्ये सत्तासंघर्ष वाढला असताना अस्थिरता निर्माण झाली त्यामुळे मलिक अहमद निजाम शहा यांना त्यांच्या वडिलांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये आपली सत्ता विस्तार करण्यासाठी पाठवले .सुरुवातीच्या काळात जुन्नर, बीड या  या भागामध्ये मलिक अहमद निजामशहा यांची सत्ता होती.

अहमदनगर शहराची स्थापना होण्यापूर्वी जे युद्ध मलिक अहमद निजामशहा आणि जहांगीर खान यांच्यामध्ये लढले गेले. त्यासाठी जहांगीर खानाचे सैन्य भिंगार जवळ आपला तळ बनवून चढाईसाठी वाट बघत होते तर मलिक अहमद निजामशहाने इमामपूर घाटामध्ये आपला तळ बसवला होता व जहांगीर खानाचे सैन्य कधी एकदा गाफील होते याची ते वाट बघत होते .ही खऱ्या अर्थाने गनिमी काव्याच्या युद्धनीतीची सुरुवात होती असे मानले जाते.

बहमनी राज्यांमध्ये चाकरी करत असलेल्या मराठा सरदारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. व आपल्या मराठ्यांचे एक स्वतंत्र असे राज्य निर्माण करण्याची अस्मिता त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती व या अस्मिते मधूनच बहमनी राज्यातील मराठा सरदारांनी मलिक अहमद निजामशहाला पाठिंबा दिला व स्वाभिमानाच्या ठिणगी मधून अहमदनगर शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली.

 अहमदनगर शहराच्या स्थापनेनंतर ते लवकरच आपल्या प्रशासन ,नागरी जीवन इत्यादींसाठी त्या काळामध्ये जागतिक स्तरावर नावाजले जाऊ लागले. निजाम शहाची प्रशासनावरील पकड ही एक अहमदनगर शहराच्या भरभराटीची जमेची बाजू होती .त्या काळामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मलिक अहमद निजामशहाने आपल्या सरदारांना कर्जमाफी मंजूर केले होते .जगाच्या इतिहासामध्ये मंजूर केलेली ही पहिली कर्जमाफी होती.

आज जे अहमदनगर शहर दिसते ते सुरुवातीपासून याठिकाणी अस्तित्वात नव्हते तर या ठिकाणी भुईकोट किल्ल्याची स्थापना करण्यात आली होती. व याच्या काही अंतरावरच कोट बाग निजाम हे स्वतंत्र असे शहर अगदी भव्य दिव्य पणे वसवण्यात आले होते .भुईकोट हा एक प्रसिद्ध असा किल्ला आहे. भुईकोट किल्ल्याची बांधणी सुद्धा अगदी अद्ययावत पणे करण्यात आली होती. भुईकोट किल्ल्याचा आकार अंडाकृती होता व त्याला तब्बल बावीस बुरूज होते. भुईकोट किल्ल्यांमध्ये गंगा, जमुना, मछलीबाई व शक्करबाई नावाच्या ४ विहिरी असून सोनमहल, मुल्कआबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल यांसारखे महाल बांधले.

निजाम शहाने कोकणातील बहुतांश किल्ले आपल्या वर्चस्वाखाली आणले होते. त्यावेळेस सुरुवात ही शिवनेरी किल्ला पासून केली होती. इतके सारे किल्ले ताब्यात असतानासुद्धा निजामशाहीची राजधानी म्हणून मलिक अहमद निजामशहा याने अहमदनगर शहराची निवड केली. निजामशाहीचे मध्यवर्ती केंद्र व राजधानी म्हणून अहमदनगर ची निवड करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे येथील भौगोलिक महत्त्व होय. कोणत्याही शहराला आवश्यक असलेले जलव्यवस्थापन हे येथील नैसर्गिक दृष्ट्या उपलब्ध असलेल्या जलस्त्रोतांचा मुळे सहज शक्य होणार होते म्हणूनच सीना नदीच्या काठी या शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली .त्याकाळात व्यापारासाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे मार्गसुद्धा अहमदनगर शहरातून जात होते हे त्यामागचे अजून एक प्रमुख कारण होय.

मलिक अहमद निजामशहाने इसवी सन चौदाशे 90 ते पंधराशे आठ या काळामध्ये अहमदनगर शहरात पाया भरण्यासाठी अनेक नवनवीन प्रयोग केले .त्यांपैकी एक म्हणजे संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी खापरी नळाचा वापर याच काळामध्ये सुरू झाला .या खापरी नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करायला परदेशा मधून तंत्रज्ञ बोलावले गेले होते. अशाप्रकारे अत्यंत दूरदृष्टी ठेवत अहमदनगर शहराची स्थापना झाली आहे.

अहमदनगर शहराचा पाया हा सर्वधर्मसमभावाच्या आधारावर बांधला गेला आहे .निजामशाहीच्या काळामध्ये दरबारात सर्वधर्म सहिष्णुता दाखवली गेली व कर्तृत्वाच्या आधारावर कोणीही उच्चपदावर अगदी सहजपणे जाऊ शकत होता .संपूर्ण भारताप्रमाणेच अगदी जगभरातील निरनिराळी कौशल्य असलेली कोणतीही व्यक्ती निजामशहा कडे आपले कौशल्य सिद्ध करून मोठे इनाम किंवा पद सहज हासिल करू शकत होती. मलिक अहमद निजामशहाने केवळ दगड विटांनी एका शहराची स्थापना केली नाही तर या शहराच्या समृद्धी मध्ये भर घालण्यासाठी तितकेच कुशल मनुष्यबळ सुद्धा आपल्या पदरी ठेवले होते.

नगर शहराच्या परिसरात निजामशाहीच्या काळामध्ये हश्त बिहिश्त महल अर्थातच हवामेहल ची स्थापना करण्यात आली. हा अष्टकोणी असा महाल होता. त्याचप्रमाणे सीना नदीच्या काठी बागरोजा ची स्थापना ही मलिक अहमद निजामशहाने केली. याठिकाणी त्याने आपले अंतिम स्मारक निर्माण केले.

अहमदनगर चा संस्थापक अहमद निजामशहाचे शहराच्या जडणघडणीमधील योगदान सांगताना प्रसिद्ध इतिहासकार व पत्रकार श्री. भूषण देशमुख.Video Source – ILoveNagar #Ahmednagar #FoundationDay #Ahmednagar530

Posted by Being Maharashtrian on Sunday, May 24, 2020