History

जंजिरा किल्ल्याविषयी या गोष्टी माहित आहेत का? जाणून घ्या या समुद्रदुर्गाविषयी महत्वाची माहिती.

जंजिरा किल्ल्याविषयी या गोष्टी माहित आहेत का? जाणून घ्या या समुद्रदुर्गाविषयी महत्वाची माहिती.

कोकणातील रायगडमधील मुरुड जंजिरा हा किल्ला आजही त्याकाळच्या पराक्रमाची साक्ष देतो. हा किल्ला समुद्रदुर्ग अर्थात समुद्रातील पाण्यात बांधण्यात आलेला किल्ला आहे. अरबी सागरात असलेला हा किल्ला कुणीच जिंकू शकले नाही असे सांगितले जाते. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण या किल्ल्याविषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत.

ह्या किल्याच्या खास बनावटीमुळे हा किल्ला कुणालाच जिंकणे शक्य झाले नाही असे सांगितले जाते. हा किल्ला अंदाजे ३५० वर्ष जुना असल्याचे सांगण्यात येते. याचे दरवाजे अत्यंत खास पद्धतीने बनवले आहेत. लांबून हा किल्ला पाहिल्यास किल्याच्या भिंतींमुळे या किल्ल्याचा दरवाजा कुठे आहे याविषयी संभ्रम निर्माण होतो. यामुळे शत्रूला किल्ल्याचा दरवाजा कुठे आहे याचा अंदाज येत नसे.

या किल्याची निर्मिती पंधराव्या शतकात अहमदनगर येथील सरदार मलिक अंबर यांच्या देखरेखीखाली सुरु करण्यात आली होती. खरेतर समुद्री लुटेऱ्यांपासून वाचण्यासाठी मच्छिमार लोकांनी हा किल्ला लाकडांच्या साहाय्याने बांधायला सुरु केला होता. यासाठी मच्छिमारांचे म्होरके असलेले राम पाटील यांनी अहमदनगरच्या निजामशाहीची परवानगी घेतली होती.

यानंतर हा किल्ला बनवून झाल्यावर अहमदनगरच्या एका सरदाराने हा किल्ला मच्छिमारांना खाली करण्यास सांगितला. मच्छिमारांनी यास विरोध केल्यावर अहमदनगरचे सेनापति बैरम खान हे व्यापारी बनून 3 जहाजांसह सैनिक घेऊन किल्यावर गेले आणि किल्यावर ताबा मिळवला. यानंतर त्यांनी लाकडांपासून बनवलेल्या या किल्याचे रूपांतर दगडी किल्ल्यात केले.

हा किल्ला बनवण्यासाठी जवळपास २२ वर्षाचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते. हा किल्ला २२ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. या किल्यात गोड्या पाण्याचे एक छोटेसे सरोवरदेखील आहे. चहुबाजूनी वेढलेल्या खऱ्या पाण्याच्या समुद्रात हे गोडे पाणी कुठून आले हा मात्र आजही कुतूहलाचा विषय आहे. हा किल्ला बराच काळ सिद्दीकी शासकांच्या ताब्यात होता.