Articles Inspirational

एकेकाळी तोट्यात गेलेल्या राँयल एनफिल्डला नंबर वन ब्रांड बनवण्याचा राँयल प्रवास, जाणून घ्या धक-धक करणाऱ्या दमदार आवाजाच्या मागचा इतिहास..!

गर्दीच्या रस्त्यांवरही आपल्या भक्कम रंगरूपामुळे उठून दिसणारी, आपल्या दमदार आवाजाने सर्वांना एकदा तरी वळून बघायला लावणारी, जो स्वार होईल त्याला रॉयल आयडेंटिटी मिळवून देणारी ,या सवारी वर एकदा तरी स्वार होण्याचे आयुष्यात एकदा तरी स्वप्न प्रत्येकाने पाहिले असेल अशी वेगवान रॉयल गाडी म्हणजे रॉयल एनफिल्ड होय.  रॉयल एनफिल्ड म्हटले की डोळ्यासमोर खूप सारे आव्हान घेऊन, शहरातल्या गुळगुळीत रस्त्यापासून लडाखच्या उंचसखल डोंगर-दर्‍या मधूनही वाट काढत वाऱ्याशी स्पर्धा करणारी गाडी डोळ्यासमोर येते. रॉयल एनफिल्ड सामर्थ्य, शक्ती आणि अगदी राजेशाही रंग रूपाचा एक संगम होय.

रॉयल एनफिल्ड हे नाव पक्के इंग्रजाळलेले वाटत असले तरीही हा ब्रांड मात्र भारतीय सभ्यता व भारतीयांच्या दमदारपणा अगदी जागतिक स्तरावर मोठ्या अभिमानाने मिरवत आहे. संपूर्ण तरुणाईला आपल्या वेगाने झपाटून टाकणारे रॉयल एनफिल्ड ही गाडी स्वातंत्र्यपूर्व काळापासून वेगवेगळ्या बनावटी मध्ये कालानुरूप बनवली गेली.इंग्रजांनी भारतावरील राज्य सोडण्या अगोदर पासून रॉयल एनफिल्ड भारतातील रस्त्यांवर धावत आहे मात्र सुरवातीच्या काळामध्ये या गाडीचा अवतार हा केवळ लष्करी अधिकारी व पोलिस यांच्यासाठी अनुरूप मानला जायचा व हेच लोक या गाडीचा वापर करत असत.1955 साली खऱ्या अर्थाने रॉयल एनफिल्डचा भारतामधील प्रवास सुरू झाला.

1947साली मद्रास मोटर कंपनीसोबत भागीदारी चा करार केल्यावर सीटीसी रॉयल एनफिल्ड बुलेट गाडीची निर्मिती केली जाऊ लागली .1955 साली रॉयल एनफिल्ड भारतीय लष्करामध्ये  मिलिटरी पँरोलच्या वापरण्यास सुरुवात केली. मात्र हळूहळू भारतामध्ये जागतिकीकरणामुळे अनेक नवनवीन कंपन्यांच्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडू शकेल अशा गाड्या उपलब्ध होऊ लागल्या व वेगाने खरेदी केल्या जाऊन तितक्याच वेगवान पद्धतीने रस्त्यांवरही धावू लागल्या. या सर्व स्पर्धेमध्ये काहीशी महागडी असलेली दमदार अशी रॉयल एनफिल्ड मागे पडली. रॉयल एनफिल्ड कंपनी  दिवाळखोरी मध्ये जाऊ लागली होती.1994 साली रॉयल एनफिल्ड कंपनीला आयशर कंपनी ने ताब्यात घेतले तरी दिवसेंदिवस रॉयल एनफिल्डचा खप कमी होऊ लागला.

आयशर कंपनीच्या व्यवस्थापनाने रॉयल एनफिल्ड विकण्याचा विचार सुरू केला मात्र इतक्या तोट्यात गेलेल्या या ब्रांडला विकत घेण्यासाठी कोणती कंपनी तयार होत नव्हती. आयशर कंपनीचे मालक असलेल्या विक्रम लाल यांचा मुलगा सिद्धार्थ लाल हे 2005साली  रॉयल एनफिल्ड कंपनीचे सीईओ बनले.सिद्धार्थ लाल हे बाईक आणि बाईक राइडच्या बाबत उत्साही होते.त्यांनी जगभरातील बाइक बद्दल स्वतःला अद्ययावत ठेवले होते. त्यामुळे आयशर कंपनी मध्ये सहभागी झाल्यानंतर आपण रॉयल एनफिल्ड पुन्हा एकदा एक नंबर चा ब्रांड बनवायचे हे त्यांनी मनाशी पक्के केले. त्यांनी  आयशर कंपनी च्या व्यवस्थापनाकडे रॉयल एनफिल्डला वाचवण्यासाठीची एक संधी मागितली  आधीच इतक्या तोट्या मध्ये असलेल्या रॉयल एनफिल्ड कंपनीच्या बाबतीत कोणता फाँर्म्युला काम करत नव्हता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना संधी देण्याचा विचार व्यवस्थापनाने केला.

लाल यांनी आयशर कंपनीचा अभ्यास सुरू केला. सिद्धार्थ लाल आयशर कंपनीचे सीईओ बनले त्यावेळी आयशर कंपनीकडून जवळपास पंधरा निरनिराळ्या प्रकारच्या उत्पादनांचा व्यवसाय केला जात होता यामध्ये ट्रॅक्टर, बाईक, कपडे इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या उत्पादनांमध्ये आयशर कंपनीने गुंतवणूक केल्याचे सिद्धार्थ यांनी पंधरा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा काही महत्त्वाच्या व फायदेशीर ठरू शकणाऱ्या निवडकच उत्पादनांवर आपल्या कंपनीकडून लक्ष केंद्रित केले जावे असा विचार बोलून दाखवला व केवळ ट्रॅक्टर आणि बाईक या दोनच उत्पादनांवर त्यांनी फोकस केले. मुख्यत्वे रॉयल एनफिल्ड हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता व त्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रमाणेच बाइक बद्दल खूप पँशन असलेल्या कर्मचाऱ्यांना रॉयल एनफिल्ड टीममध्ये सहभागी करून घेतले.

कंपनीच्या 15 उत्पादनांपैकी जवळपास 13 उत्पादने त्यांनी निरनिराळ्या कंपन्यांकडे मालकी दिली व पूर्णपणे रॉयल एनफिल्डसाठी आपले परिश्रम दिले. रॉयल एनफिल्ड मधील क्षमता आणि मार्केटिंग मध्ये हा ब्रँड नक्की कुठे कमी पडतो आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतः सिद्धार्थ लाल यांनी हजारो किलोमीटर्सचा रॉयल एनफिल्ड वर स्वतः प्रवास केला व एक  ग्राहकाच्या दृष्टिकोनातून रॉयल एनफिल्ड कडून असलेल्या बाजारपेठेतील अपेक्षांना समजून घेतले. सिद्धार्थ लाल स्वतः एक उत्तम रायडर असल्यामुळे त्यांना राँयल एनफिल्ड वापरणार्‍या बाईक रायडर ला नक्की या गाडी कडून काय हवे आहे हे अतिशय उत्तम पणे समजले.

सिद्धार्थ लाल यांनी  मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण घेतले होते व त्याचा फायदा त्यांना रॉयल एनफिल्ड ला एक नवीन लुक देण्यामध्ये झाला. रॉयल एनफिल्ड मध्ये त्यांनी अनेक तांत्रिक बदल ग्राहकांच्या उपयोगाच्या दृष्टीने घडवून आणले. यामध्ये आधी गिअर प्लेट उजव्या बाजूला होती तिला डाव्या बाजूला आणले त्यानंतर इंजिन मध्ये सुद्धा अनेक अमुलाग्र बदल त्यांनी घडवून आणले मात्र या सर्व बदल करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी रॉयल एनफिल्डचा क्लासिक लुक  मात्र कायम ठेवला आहे.

सध्याच्या तरुण पिढी पुढच्या रॉयल एनफिल्ड बाबतच्या अपेक्षा जाणून घेऊन रॉयल एनफील्ड चालवताना चा ग्राहकांना येणारा अनुभवाचा दर्जा उच्च ठेवण्यावर सिद्धार्थ लाल यांनी भर ठेवला. 2004आणि 2005 मध्ये चेन्नई येथून रॉयल एनफिल्ड चे उत्पादन घेतले गेले. रॉयल एनफिल्ड त्यानंतर थंडरबर्ड आणि बुलेट इलेक्ट्रा या मॉडेल्स लॉन्च करण्यात आल्या. रॉयल एनफिल्ड तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुख्यत्वे रॉयल बिल्डींग वरती भर दिला गेला व त्याची एक विशिष्ट इमेज तयार करण्यावर नेहमीच भर दिला गेला केवळ तांत्रिक बद्दलच नव्हे तर रॉयल एनफिल्ड ग्राहकांचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी रॉयल एनफिल्ड च्या आउटलेट मध्ये सुद्धा अनेक कायापालट करण्यात आले. हळूहळू ग्राहकांचा ओढा पुन्हा एकदा राँयल एनफिल्डकडे वाढू लागला.

1955 साली इंडियन आर्मी राँयल एनफिल्डचा  वापर करत असे त्यामुळे रॉयल एनफिल्ड म्हणजे सामर्थ्य आणि आणि साहस यांचे प्रतीक सुरुवातीपासूनच मानले जात होते. रॉयल एनफिल्डची एक प्रकारे क्रेझ सध्याच्या जनरेशन मध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे ज्यांना रॉयल एनफिल्ड बद्दल काही तांत्रिक माहिती नाही किंवा बाइक बद्दल फारशी माहिती नाही त्यांचे सुद्धा रॉयल एनफिल्ड खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्याची इच्छा असते.रॉयल एनफिल्डची एक इमेज ग्राहकांच्या मनात घट्टपणे रोवली गेली आहे त्यामुळे कधीही टीव्ही किंवा वर्तमानपत्रांमध्ये रॉयल एनफिल्ड ची जाहिरात दाखवली जात नाही किंवा रॉयल एनफिल्ड प्रमोट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खेळाडू किंवा अभिनेत्याची  गरज भासली नाही.

जेव्हा सिद्धार्थ लाल यांनी वयाच्या अवघ्या सविसाव्या वर्षी रॉयल एनफिल्ड ला देशामध्ये नंबर वन चा ब्रांड बनवून देण्यासाठी कंबर बसली तेव्हा महिन्याभरात केवळ दहा हजार रॉयल एनफिल्डचे उत्पादन चेन्नई येथील युनिटमध्ये होत असे व त्यापैकी दोन हजार पेक्षा सुद्धा कमी बाईक एक महिन्यात  विकल्या जात असत मात्र आता परिस्थिती अशी आहे की रॉयल एनफिल्ड चे बुकिंग केल्यानंतर साधारण चार ते आठ महिने वाट गाडी मिळेपर्यंत बघावी लागते. रॉयल एनफिल्ड सारखे बुलेट बनवण्याचा प्रयोग बजाज सारख्या या वाहन उद्योगामधील कंपन्यांनी सुद्धा केला होता मात्र रॉयल एनफिल्डचे जागा कोणीही घेऊ शकले नाही. देशातील नंबर वन ब्रांड बनवण्यासाठी रॉयल एनफिल्ड निर्मितीमध्ये अतिशय संयमी व फोकस्ड द्रूष्टिकोन  सिद्धार्थ लाल यांनी कायम ठेवला म्हणूनच त्यांनी 350सीसी आणि 750 सीसी या दोन उत्पादनांवर अधिक लक्ष केंद्रित केले. 

केवळ चेन्नई येथे उत्पादन होणाऱ्या रॉयल एनफिल्ड च्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा देशभर विस्तार करण्यात आला व आता जागतिक स्तरावरील रॉयल एनफिल्ड ची वाढती मागणी लक्षात घेता लंडन येथे एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर रॉयल एनफिल्ड मधील तांत्रिक सुधारणा घडवून आणण्यासाठी उघडण्यात आले. परदेशातील रस्त्यांवर सुद्धा रॉयल एनफिल्ड एक ब्रँड म्हणून धावेल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. ब्रँड इमेजिंग, संयम या गोष्टींचा मेळ योग्य रीतीने साधला असता कशा प्रकारे यश मिळते याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे रॉयल एनफिल्ड होय.आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत आपला गाशा गुंडाळण्याचा प्लँन करणाऱ्या रॉयल एनफिल्डला मिळालेले यश आकडेवारीमध्ये मोजायचे झाले तर 2005 झाली रॉयल 25000 बाईक विकल्या गेल्या तर 2012 साल हा आकडा 81 हजारच्या पार होता तर 2017 साली जवळपास दीड लाख देशभरात विकल्या गेल्या आहेत.

ज्या चिकाटीने सिद्धार्थ लाल यांनी रॉयल एनफिल्डला भारतामधील एक अग्रगण्य ब्रॅन्ड बनवले आहे याची प्रचिती संरक्षण दलाकडून राजपथावर जेव्हा संचलन केले जाते तेव्हा लष्कराकडून रॉयल एनफिल्ड चा वापर केला जातो, कोणत्याही चित्रपटामध्ये  नायक दाखवायचा असेल तर त्याला हमखास रॉयल एनफिल्ड वर एंट्रि दिली जाते हा जो एक भक्कम पणा आणि विश्वासार्हता निर्माण झाला आहे  त्यामागे सिद्धार्थ लाल यांचे परिश्रम आहेत व त्या यांनी भारतामध्ये रॉयल एन्फिल्ड प्रस्थापित करण्यासाठी आपल्या आयुष्यातील पंधरा वर्ष दिली आता पुढील पंधरा वर्ष ही रॉयल एन्फिल्ड जागतिक स्तरावर अग्रगण्य ब्रांड बनवण्यासाठी देणार असल्याचे ते सांगतात.रॉयल एनफिल्ड बाईक रायडर साठी निराळ्या मोहिमा स्पॉन्सर करते त्यामध्ये हिमालयन ओडिसीचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.