Maharashtra National News Politician Politics

खरा शिवसैनिक ‘त्या’ एका गोष्टीसाठी पंतप्रधान मोदींसोबत येईल: ‘या’ भाजप खासदाराचा दावा

Uddhav-Modi
Uddhav-Modi

राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र याआधी या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण तापले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या वादात आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्ता स्थापन करत भाजपला मोठा धक्का दिला. त्यामुळे १०५ आमदार असून देखील विरोधात बसावे लागल्याने भाजपचा तिळपापड झाला आहे. सध्या राज्यात दूधदराविरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राम मंदिराच्या मुद्द्यावर सुजय विखेंनी मोठा दावा केला आहे.शिवसेनेचा कट्टर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. हा कार्यकर्ता राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपसोबत एकत्र येणार आहे’, असा दावा विखेंनी केला आहे.

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले कि, जर सेनेच्या नेतृत्वाने आपला स्वाभिमान गहाण ठेवला असेल तरीही कट्टर शिवसैनिक सेनेची स्थापन ज्यासाठी झाली आहे, त्या राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसैनिकांनी आंदोलनं केली होती, जेलमध्ये गेली होती. ते सर्व कट्टर कार्यकर्ते हे राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्व स्वीकारतील, असा दावाही सुजय विखेंनी केला आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने मतपरिवर्तन होईल आणि याचे परिणाम हे महाविकास आघाडी सरकारवर दिसतील’, असंही सुजय विखे म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यात दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव व 10 रुपये अनुदान,दुध भुकटीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळावा, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खते,बी बियाणे मिळावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीज बील माफ करावे आदी मागण्यांसाठी विविध तालुक्यात भाजपने आणि शेतकरी संघटनांनी आंदोलने केली.

दरम्यान, संपूर्ण राज्यभरात दूध दरावरून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. अहमदनगरसह संपूर्ण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यासाठी आंदोलन सुरु असून खासदार सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डीत तर माजी मंत्री राम शिंदे यांनी नगर सोलापूर महामार्गावर आंदोलन केले. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभे राहून शेतकऱ्यांना मोफत दूध वाटप करून आंदोलन करत महाविकास आघाडीचा निषेध केला.