Maharashtra National News Politician Politics

…म्हणून मी घराबाहेर जाणं टाळतो; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा खुलासा

raj thakre
raj thakre

सध्या राज्यात कोरोनाचा काळ आहे, अशावेळी गर्दी करणे, लोकांना एकत्र करणं योग्य नाही, मी बाहेर पडलो, लोकं जमा होतील, म्हणून जास्तीत जास्त काळजी घेतो, जे शासकीय पदावर आहेत त्यांनी बाहेर पडणे गरजेचे आहेच, कारण त्यांना शासकीय अधिकाऱ्यांशी बोलायचं असतं, मी गेलो तर फक्त आमचे कार्यकर्ते येणार, लोकं गोळा होणार म्हणून मी बाहेर जाणं टाळतो असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

याचबरोबर माझा महाराष्ट्र माझा व्हिजन मध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? आता सगळं सुरळीत करावंच लागेल. आपल्याला आता कोरोना विषाणूसोबत जगावंच लागेल कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे पण त्याचा बाऊ खूप केला गेला. आणि मोठ्या घरांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये कुठून क्वारंटाईन होणार होते?त्याचबरोबर सुरुवातीला ह्या आजाराचं गांभीर्य कळत नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला जे झालं ते झालं, पण आता अनलॉक करावंच लागेल, आणि लोकांना घराबाहेर पडण्यासाठी लोकांना हुरूप निर्माण करावं लागेल. माझ्यासाठी लोकं भीतीच्या वातावरणातून बाहेर येणं महत्वाचं आहे.अर्थव्यवस्था आज जवळपास ठप्प झाली आहे, लोकांच्या नोकऱ्या जात आहेत त्यामुळे आता ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार नक्की काय करणार आहे ह्या विषयी सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही राज ठाकरे स्पष्ट केले.

परराज्यातील कामगार त्यांच्या राज्यात लॉकडाऊनच्या काळात परत गेलेत आता तिथे मराठी मुलांनाच नोकऱ्या मिळाव्यात ह्यासाठी पक्ष काम करत आहेत. माझे प्रतिनिधी कंपन्यांशी बोलत आहेत पण ह्यासाठी राज्य सरकारने धोरण आखायलाच हवं. कोरोनाच्या ह्या संकटाच्या काळात गेल्या ४ महिन्यात जे काम केलंय त्याची तुलनाच होऊ शकत नाही. माझा महाराष्ट्र सैनिक गेले ४ महिने रस्त्यावर फिरत होता लोकांच्या मदतीला धावून जात होते. कोरोनाच्या काळात मी घराबाहेर जाणं टाळलं कारण मी बाहेर गेलो असतो तर माझ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली असती त्यातून संसर्गाची भीती होती पण जे सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणं आवश्यक होतं.

तसेच राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीये, दिसला नाही, अशी टीका देखील केली. त्याचबरोबर राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना ह्याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा.कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं. भविष्यात ह्यावर बोलूच. कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची वारेमाप लूट केली पण त्यांच्यावर सरकार चाप लावू शकला नाही. खाजगी रुग्णालयांना सरकारकडून सवलती मिळतात तरी रुग्णांना ती नाकारू कशी शकतात?

राम मंदिराच्या मुद्द्यावर देखील यावेळी राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राममंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य करसेवकांनी त्यासाठी प्राणांची आहुती दिली त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही, असेहि त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधाकडक्यात भूमिपूजन व्हायला हवं. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको त्याचं जल्लोषात भूमिपूजन हवं.सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही परंतु इच्छा सगळ्यांची असते तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही.

सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हे पुढे जाऊन कळेल.मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्यायला हवी, मात्र तिथे उगाच काही वाकडेतिकडे नियम लावता कामा नये, आज जगातील अनेक देशांत सगळं सुरळीत झालं आहे. पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे पण आता बंद ठेवणं हा मार्ग नाही.राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीये ताळमेळ जाणवत नाहीये.

दरम्यान, माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असावा ह्याचं चित्र माझ्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्यात मांडला आहे, जेंव्हा माझ्या हातात सत्ता येईल तेंव्हा मी तो घडवेन. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं माझा स्वप्न आहे त्यासाठी जनतेनी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला केले.