Featured Top 10

पुण्याला गेलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या

पुणे तिथे काय उणे… पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यामध्ये मुळची मराठी संस्कृती व इतर संस्कृतीचे गुणविशेष ज्यामध्ये शिक्षण, कला,हस्त व्यवसाय आणि नाट्यशाळा यांची विशिष्टता आहे.पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकएन्डला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात.तर चला जाणून घेऊया पुण्यातल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांविषयी:-
१) शनिवार वाडा
शनिवार वाडा म्हणजे पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू, पेशवे बाजीराव यांचे निवासस्थान व कार्यालय. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली हा राजवाडा बांधला होता. त्या काळी या वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा.इंग्रजांनी वाड्यावर कब्जा केल्यानंतर एके दिवशी
वाड्याला आग लागून सगळे अवशेष नष्ट झाले. आता या वास्तू मध्ये फक्त पायाचा भाग उरलेला असून वाड्याची तटबंदी बघण्यासारखी आहे.

२)श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
सन १८९३, श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यात आलेल्या प्लेग च्या साथीत त्यांच्या मुलाचे देहावसान झाले त्यामुळे त्यांनी एका महाराजांच्या सांगण्यावरून गणपती आणि दत्त यांची मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून दगडूशेठ गणपती ची विशेषता सगळीकडे पसरलेली आहे. पुण्यात आलात आणि दगडूशेठ गणपती चे दर्शन नाही घेतले असे सहसा कोणाकडून होत नाही. गणपती विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला विशेष मान असून मंडळाची मिरवणूक भव्यदिव्य असते. तेव्हा चला उरका पटापट, दर्शनाला जाऊयात.

३) आगा खान पॅलेस
गांधी मेमोरिअल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात महात्मा
गांधी, कस्तूरबा गांधी,महादेव भाई यांच्यासाठी तुरूंगासाठी करण्यात आला होता.असं म्हणतात की महादेव भाई आणि कस्तूरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये
अखेरचा श्वास घेतला होता. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे.

४) सारसबाग
पुणे शहरातील स्वारगेट येथे सारसबाग आहे. हिरव्या गार झाडे आणि फुलझाडांनी नटलेली ही बाग पुणे शहराची शान आहे. बागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये एक गणपतीचे मंदिर आहे. या गणपतीच्या मंदिला तळ्यातला गणपती असे म्हणतात. बागेत व्यायाम आणि बोटींगसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी फुलराणी नावाची एक रेल्वेदेखील साारसबागेत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या लहानमुलांना घेऊन पुण्यात जाणार असाल तर सारसबागेत जरूर जा.

५) तुळशीबाग
पुण्यात गेल्यावर जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर पुण्यातील तुळशीबागेला जरूर भेट द्या. तुळशीबागेत तुम्हाला काय मिळेल यापेक्षा काय मिळणार नाही हेच विचारावं लागेल. कारण तुळशीबागेत तुम्हाला सौंदर्यसाधने, देवदेवतांच्या मुर्ती, भांडी-कुंडी, खेळणी, भेटवस्तू अशा सर्वच गोष्टींमध्ये निरनिराळे प्रकार मिळू शकतात.

६) पर्वती
पुणे शहरात सकाळी फिरायला जाण्यासाठी पर्वती हे ठिकाण नक्कीच उत्तम आहे. पर्वती ही छोटेखानी टेकडी आहे ज्यावर अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पुण्यात मॉर्निंगवॉकसाठी पर्वतीवर जाण्याची पद्धत आहे. पुर्वीच्या काळी पेशव्यांचे प्रार्थना करण्याचे ठिकाण म्हणून पर्वती प्रसिद्ध होती. सकाळच्या रम्य वेळी शुद्ध हवेत मेडीटेशन करण्यासाठी पर्वतीवर आजही लोक जातात.

७) सिंहगड
पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिध्द व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. पुणे शहरापासून 25 कि.मी. अंतरावर हा किल्ला असून तो 1290 मीटर उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्युची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले “गड आला पण सिंह गेला” त्यानंतर त्यांनी कोढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. पुण्यात सगळ्यात जास्त बघायला जाणाऱ्या ठिकाणांमध्ये सिंहगड हा किल्ला प्रसिद्ध आहे.

८)राजीव गांधी प्राणीसंग्रहालय
कात्रजमधील राजीव गांधी सर्पोद्यान जवळजवळ 130 किमीवर पसरलेले आहे. या उद्यानामध्ये विविध जातीचे सर्प आणि जंगलातील प्राणीसंग्रहालय आहे. हे प्राणीसंग्रहालय फिरण्यासाठी कमीत कमी एक दिवस तुम्हाला लागेल एवढं मोठं आहे. दिवसभराच्या दगदगीतून निवांतपणा हवा असेल या उद्यानात नक्की जा.

९) लवासा सिटी
नैसर्गिक सौंदर्यापेक्षा वादामुळे जास्त प्रसिध्द असलेली लवासा सिटी. पुण्यापासून ६० किमी वर वसलेले हे अत्याधुनिक शहर म्हणजे वाखाणण्यासारखे आहे. येथील प्रशस्थ बांधकाम, त्यातील कला बघण्यासारखी आहे. आपण भारतात नसून परदेशात आल्यासारखा इथे अनुभव येतो. परंतु सध्या लवासा भेटीसाठी २ व्हिलर साठी १०० रुपये प्रत्येकी आणि ४ व्हिलर साठी ५०० रुपये पार्किंग फी घेतली जाते.

१०) चतुश्रुंगी मंदिर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बांधलेले मंदिर अशी या मंदिराची ख्याती असून देवीच्या दर्शनाला पुण्यातून भरपूर गर्दी असते. पुण्यातल्या पुण्यात येता जाता या मंदिरात फिरायला जायला पुणेकरांना जास्तच आवडते.