News

नायलॉन मांजाच्या पतंगबाजी मुळे नागपुरात तरुणाचा मृत्यू!

मकर संक्रांत म्हटली की तिळगुळ, सुवासिनी स्त्रिया करतात ते हळदीकुंकू, आणि महत्वाचं म्हणजे पतंग उडवणे ही प्रथा आपल्या डोळ्यासमोर येते. कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम किती होऊ शकतात, याचे उदाहरण नागपुरातून आता समोर येताना दिसत आहे.

नागपूरमध्ये जीवघेण्या पतंगबाजी ने 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रणय ठाकरे असे या तरुणाचे नाव असून अगदी ऐन गर्दीच्या ठिकाणी मांजाने गळा कापला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याने, नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच पॉलिटेक्निकल चे शिक्षण पूर्ण केलेले असताना प्रणयच्या डोळ्यात भविष्याबद्दल अनेक स्वप्न होती. बहिणीच्या ऍडमिशन चे कर्तव्य पूर्ण करताना तो गाडीवरून घराकडे निघाला होता. नागपूरच्या रामबाग आणि जाटतरोडि दरम्यान नायलॉन मांजा गाडीसमोर आडवा आल्याने तो त्याच्या हेलमेट मध्ये अडकला.

ते काढण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूने मांजा ओढला गेला आणि गळा चिरून त्याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात आरोपी विरोधात तक्रार नोंद झाली आहे मात्र अजूनही आरोपी ताब्यात आले नाहीत. अशा जीवघेण्या घटनेला सामोरे जाणारा प्रणय एकटाच नाही. अनेकांना नागपुरात गेल्या पंधरा दिवसात गंभीर दुखापत झाली आहे. अनेकांचा जीव जाताजाता वाचला आहे. मात्र असे नायलॉन मांजाने पतंग उडवणारे लोक अजूनही ताब्यात आले नाहीत. सण समारंभ साजरे करताना, कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणाचे धोरण सणाला गालबोट तर लावत नाही ना? याकडे प्रत्येकाने गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे.