News

जाणून घ्या धनंजय मुंडे यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपाच्या खुलाश्याबाबत!

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले, आणि त्यानंतर महाराष्ट्र मधील वातावरण एकदम बदलले. त्या तरुणीने केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे स्वतःचे स्पष्टीकरण अगदी सरळ शब्दात दिले आहे. बलात्काराचे आरोप फेटाळून लावत त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत!

फेसबुक पोस्ट मधून त्यांनी आपल्याविषयी विविध कागदपत्रे प्रसारित होत असल्याचे आणि सोशल मीडियाद्वारे बलात्काराचे आरोप लावण्यात येत असल्याचे सांगितले. रेणू शर्मा नावाच्या महिलेने स्वतःच्या खात्यावरून ट्विट करून आपल्या विरोधात तक्रार दाखल केल्याचा उल्लेख देखील कागदपत्रांमधून पाहायला मिळाला असल्याचे देखील त्यांनी मान्य केले. हे आरोप बदनामी करणारे आणि खोटे आहेत यातून आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा खुलासा केला. प्रकरणाची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.

करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत 2003 पासून त्यांचे परस्पर सहमतीने संबंध होते ही बाब त्यांनी मान्य केली. त्यांचे कुटुंबीय पत्नी आणि मित्रपरिवार यांना देखील ही बाब अवगत असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. परस्पर सहमतीच्या संबंधांमधून त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आणि त्यांना देखील धनंजय मुंडे यांनी आपले नाव दिले आहे असा उल्लेख या पोस्टमध्ये आहे.

शाळेचा दाखला पासून ते इतर सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून धनंजय मुंडे यांचेच नाव आहे असा देखील उल्लेख या पोस्टमधून करण्यात आल्याचे समजते. ती दोन्ही मुले धनंजय मुंडे यांच्या बरोबरच राहतात त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाने सुद्धा त्या दोघांना सामावून घेतल्याचे त्यांनी सांगितले.

नोव्हेंबर 2020 मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यमाच्या द्वारे धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याच्या हेतूने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. काही व्यक्तिगत आणि खाजगी साहित्य त्याद्वारे प्रकाशित करण्यात आले होते. न्याय मिळावा म्हणून माननीय उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात याचिका देखील धनंजय मुंडे यांनी दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने सुद्धा करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित न करण्यास आदेश पारित केले आणि पुढील सुनावणीसाठी ही याचिका अजूनही प्रलंबित आहे असे देखील त्यांनी सांगितले. रेणू शर्मा या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत आणि त्यांनी देखील धनंजय मुंडे विरोधात खोटे आणि बदनामीकारक आरोप केले त्याचबरोबर कोट्यावधी रुपयांची मागणी केली आणि त्याचे पुरावे एस एम एस रूपात माझ्याजवळ आहेत असेदेखील धनंजय मुंडे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा याने देखील आपणास ब्लॅकमेल केल्याचे आणि खंडणी वसूल करण्याच्या योजनेचा हा भाग तयार केल्याचे धनंजय मुंडे यांनी या पोस्ट मधून सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सर्वात मोठा खुलासा असला तरीदेखील, कोणत्याही राजकारण्याने असे समोर येऊन आरोप फेटाळून लावणे आणि या प्रकारचा मोठा खुलासा करणे ही पहिली वेळ आहे. या सर्व प्रकरणांची सुयोग्य चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईलच. मात्र, धनंजय मुंडे यांनी माध्यमांना देखील वृत्त प्रसिद्ध करताना वस्तुस्थिती प्रसिद्ध करावी अशी विनंती केली आहे.