News

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाकडे तक्रार, राजीनाम्याची मागणी! काय झाल्या घडामोडी जाणून घ्या!

सामाजिक न्याय मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता आणि त्यासंदर्भात काल त्यांनी खुलासा सादर केला. फेसबुकच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी बलात्काराचे आरोप फेटाळत आरोप केलेली महिला रेणू हिच्या बहिणीसोबत म्हणजे करूणा सोबत असलेल्या परस्पर सहमतीच्या संबंधातून दोन मुले झाल्याचा गौप्यस्फोट केला.

त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत थेट निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. सामाजिक न्याय मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या या दुष्कृत्याबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा आणि त्यांच्यावर लागलेले लैंगिक शोषणाचे आरोप पाहता मंत्री पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीदेखील धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली दिली असल्याने पक्षानं त्याची तातडीने दखल घेत नैतिकता महत्त्वाची समजून चौकशी करून काय होतं ते बघावं असे म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी देखील धनंजय मुंडे यांनी स्वतः कबूल केल्याने गोष्टींची सखोल चौकशी करून निवडणूक आयोगाने तपास घ्यायला हवा आणि त्यासाठी तशी तक्रार केली आहे, असे म्हटले आहे.