तृतीयपंथीयांकडून ‘या’ गोष्टी करवून घेतल्यावर फायदा होतो कि तोटा?

तृतीयपंथीयांकडून ‘या’ गोष्टी करवून घेतल्यावर फायदा होतो कि तोटा?

आपल्याकडे तृतीयपंथी अर्थात किन्नरांकडे वेगळ्या दृष्टीने पहिले जाते. पुरुष आणि स्त्री यांच्यासारखाच एक घटक म्हणून तृतीयपंथीयांना आपल्याकडे सन्मानजनक वागणूक दिली जात नाही. हे जरी खरे असले तरी अनेक लोक किन्नरांकडून काही गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत असतात. किन्नरांकडून अशा गोष्टी मिळवल्यास आपल्याकडे सुखसमृद्धी नांदेल असं मानणारा वर्ग भारतात आहे. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण याविषयी माहिती पाहणार आहोत.

एखाद्या कार्यक्रमात किंवा शुभप्रसंगी तृतीयपंथीयांना आवर्जून आमंत्रित केले जाते. त्यांचे खास मानपान केले जाते. त्यांना काय हवं नको ते पहिले जाते. हे सर्व करण्याचा हेतू हा असतो कि किन्नरांनी आशीर्वाद द्यावेत जेणेकरून शुभप्रसंग असणार्यांच्या घरात सुख समृद्धी नांदेल. किन्नरांच्या आशीर्वादाने संकटे दूर होऊन सुखाचे दिवस येतात अशी बऱ्याच जणांची श्रद्धा आहे.

बस, रेल्वे किंवा इतरही सार्वजनिक ठिकाणी अनेकजण किन्नर दिसले कि स्वतःहून त्यांना काही पैसे दान म्हणून देतात. याबदल्यात ते किन्नरांकडे असलेल्या पैशांपैकी एखाद्या ठोकळ्याची किंवा नोटेची मागणी करतात. किन्नरही ख़ुशीने अशी नोट किंवा ठोकळा पैसे देणार्याला देतात. किन्नरांकडून असे पैसे घेऊन ते सोबत ठेवल्यास आपल्याकडे येणाऱ्या संपत्तीचा ओघ थांबत नाही अशी बऱ्याच जणांची श्रद्धा आहे.

लग्नसमारंभात वधू-वराला आशीर्वाद देण्यासाठीदेखील किन्नरांना आमंत्रित केले जाते. किन्नरांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिल्यास त्यांचा संसार सुखाचा होतो असाही समज आहे. त्याचप्रमाणे बाळाच्या नामकरण सोहळ्याला अर्थात बारशालादेखील किन्नरांना बोलावले जाते. बाळाच्या उज्वल भविष्याची अन दीर्घायुष्याची कामना किन्नराने केल्यास ही कामना पूर्णत्वास जाते असा काहींना विश्वास वाटतो.

किन्नरांविषयी वर नमूद केलेल्या अनेक मुद्यांना काहीजण अंधश्रद्धा समजतात तर काहीजणांची यावर अपार श्रद्धा असते. व्यक्तिस्वातंत्र्यानुसार या गोष्टींवर विश्वास ठेवावा कि नाही हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. मात्र तृतीयपंथी अर्थात किन्नरांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहणे हे जास्त महत्वाचे आहे एवढे मात्र नक्की.