National

भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला मिळतात ‘या’ सुविधा! मोफत विमानप्रवास आणि अजूनही बरेच काही जाणून घ्या

भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला मिळतात ‘या’ सुविधा! मोफत विमानप्रवास आणि अजूनही बरेच काही जाणून घ्या

भारतरत्न. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यांसमोर उभा राहतो तो भारत सरकारद्वारे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान. एखाद्या क्षेत्रात भरीव आणि अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा भारतातील सर्वांत मानाचा आणि सर्वोच्च असा सन्मान दिला जातो. अनेकांना हा सन्मान आपल्याला मिळाला तर काय होईल याची सुंदर कल्पना येत असते. तसेच या सन्मानाने आणि सन्मानानंतर मिळणाऱ्या सुविधांविषयी अनेकांना आकर्षण आणि कुतूहल असल्याचे पाहायला मिळते. याच अनुषंगाने आजच्या लेखात आपण भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला शासनाकडून कोणकोणत्या सुविधा देण्यात येतात याविषयी माहिती पाहणार आहोत.

VVIP समकक्ष : Very Very Important Person (VVIP) अर्थात ‘अति अति महत्वाची व्यक्ती’ असा दर्जा आपल्या देशात अत्यंत कमी व्यक्तींना दिला जातो. यामध्ये अत्यंत उच्चपदस्थ लोकांना स्थान दिलेले असते आणि तशी सुरक्षादेखील असते. भारतरत्नप्राप्त व्यक्तीलादेखील या दर्जाच्या समकक्ष मानले जाते. व त्या अनुषंगाने तशा बर्याचश्या सुविधा पुरस्कारप्राप्त व्यक्तीला दिल्या जातात.

संसदेच्या बैठका/चर्चासत्रात सहभाग : भारतीय लोकशाहीमध्ये उच्च स्थान असलेल्या संसद याठिकाणी होणाऱ्या बैठकांमध्ये तसेच चर्चासत्रांमध्ये भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला सहभागी होण्यासाठी सवलत दिली जाते.

मोफत रेल्वे/विमानप्रवास : भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला देशभरात कुठेही फिरण्यासाठी रेल्वे किंवा विमानाचे तिकीट काढावे लागत नाही. भारतात कुठेही दौरा करावयाचा असल्यास सदरील पुरस्कारप्राप्त व्यक्तीला एअर इंडिया विमानातून तसेच रेल्वेतूनदेखील प्रथम श्रेणीतून मोफत प्रवास करता येतो.

कॅबिनेट स्तराचा मान : देश आणि राज्य याठिकाणी असणाऱ्या महत्वाच्या सर्वोच्च पदानंतर भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला कॅबिनेट स्तराचा मान दिला जातो. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, माजी प्रधानमंत्री, लोकसभा/राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, केंद्रातील कॅबिनेट मंत्री, योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यानंतर भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला कॅबिनेट स्तराचा मान दिला जातो.

गरजेनुसार Z सुरक्षा : भारतामध्ये महत्वाच्या व्यक्तींसाठी विविध प्रकारची सुरक्षा पुरवली जाते. यापैकीच एक असलेली Z सुरक्षा हि सुरक्षाव्यवस्था महत्वाची मानली जाते. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तीला आवश्यकता असल्यास सरकारकडून Z सुरक्षा पुरवली जाते.

विदेश तसेच देशान्तर्गत दौरा : भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्ती जर भारताबाहेर एखाद्या देशात गेली तर त्या व्यक्तीला त्या देशातील भारतीय दूतावासाकडून शक्य तितक्या सुविधा पुरवल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे भारतातही कुठल्याही राज्यात सदरील पुरस्कारप्राप्त व्यक्ती गेल्यास त्या राज्यातील अतिथिगृहाची मोफत सुविधा सदरील व्यक्तींसाठी ते राज्य सरकार करते.