Haldi Ceremony

विवाहाच्या अगोदर वधु आणि वराला हळद का लावली जाते? जाणून घ्या

भारतीय संस्कृतीमध्ये समाजव्यवस्थेशी संबंधित काही नियम व परंपरा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याच्या आयुष्याचे चार आश्रमांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी गृहस्थाश्रम म्हणजे व्यक्तीची ब्रह्मचर्य सोडून संसारिक जबाबदाऱ्यांमध्ये प्रवेश घेण्याची अवस्था होय. गृहस्थाश्रमाची सुरुवात ही विवाहासारख्या पवित्र बंधनाने होते. भारतीय संस्कृतीमध्ये विवाह ही अतिशय पवित्र अशी विधी मानली जाते व या दृष्टीने अनेक निरनिराळ्या प्रथा आणि परंपरा यांचा समावेश विवाह पार पाडण्या मध्ये केला जातो.

भारतामधील वेगवेगळ्या भागांमध्ये विवाहाच्या पद्धती या भिन्न आहेत मात्र साधारणपणे सगळ्याचं भागांमध्ये विवाहात पार पाडली जाणारी पद्धत म्हणजे हळदी समारंभ होय. हळदी समारंभ ही परंपरा विवाहा साठी जोडप्याने उभे राहण्या अगोदरची अतिशय महत्त्वाची अशी परंपरा आहे.  अगदी साधेपणाने विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुद्धा लग्नाअगोदर हळद लावली जाते. हळदी समारंभाचे वेळी वधू आणि वर पक्षाकडील व्यक्ती ,नातेवाईक ,मित्रमंडळी एकत्र येऊन चेष्टा-मस्करी च्या वातावरणामध्ये वधूवरांना हळद लावली जाते. हळद लावणे ही केवळ एक एकत्र येण्याचा मार्ग नसून यामागे काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत. आज आपण वधूवरांना हळद लावण्याच्या परंपरेमागची कारणे जाणून घेणार आहोत.

 लग्नाअगोदर वधू-वराला हळद लावण्याचे पिढ्यानपिढ्या सांगितले जाणारे कारण म्हणजे वाईट नजर किंवा अशुभ घटितापासून वधू आणि वराचे संरक्षण करणे होय. यामुळेच वधू आणि वर यांना हळद लावल्यानंतर त्यांना कोणत्याही निर्जन जागी किंवा अज्ञात जागी जाणे यास मज्जाव घातला जातो. हळदीच्या वेळी त्यांना एक पवित्र असा धागा बांधला जातो ज्यामुळे त्यांचे कोणत्याही वाईट हेतूपासून संरक्षण होईल.

भारतीय संस्कृती मध्ये पिवळा रंग शुभ आणि पवित्र मानला जातो यामुळे आपल्या नवीन आयुष्याची वैवाहिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या नववधू आणि वरास पिवळ्या रंगाची हळद लावली जाते. पिवळा रंग पवित्र मानला जातो त्यामुळे काही विवाह समारंभामध्ये वर आणि वधू पिवळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करतात.

विवाह हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. या दिवशी छान दिसणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपल्या त्वचेवर याविषयी वेगळी चमक यावी यासाठी आजकाल ब्यूटी पार्लरमध्ये निरनिराळ्या ट्रीटमेंट लग्नाअगोदर घेतल्या जातात .मात्र पूर्वीच्या काळी ब्युटी पार्लर किंवा सौंदर्यप्रसाधने मोठ्या प्रमाणात उपलब्ध नव्हती त्यामुळे त्याकाळी नैसर्गिक रूपात उपलब्ध होणाऱ्या वनस्पती व पदार्थांचा वापर आपले सौंदर्य खुलवण्यासाठी केला जायचा. हळद हि त्वचेवर ती नैसर्गिक चमक व तजेला निर्माण करण्यासाठी वापरली जायची. म्हणूनच विवाहाच्या अगोदर वधू आणि वर यांना हळद लावली जायची.

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म सुद्धा असतात . हळद ही अँटी सेप्टीक गुणधर्म असलेली वनस्पती आहे .लग्नाच्या अगोदर कोणत्याही प्रकारच्या त्वचेचा संसर्ग किंवा जखम झालेली असेल तर त्याचे संक्रमण होऊ नये यासाठी हळदीचा उपयोग होतो.

हळदीमध्ये त्वचेच्या शुद्धी चे गुणधर्म असतात. हळद लावल्यानंतर ते धुऊन टाकल्यावर त्वचेवरील मृत पेशी व विषद्रव्ये निघून जातात.

 हळदीमध्ये कर्क्युमिन अँटिऑक्सिडंट अस्तित्वात असते. या एंटीऑक्सीडेंट मुळे लग्नाच्या दिवशी निर्माण होणारा तणाव व थकवा दूर होण्यास मदत होते. तसेच तणाव विरहीत राहिल्यामुळे डोकेदुखीचा त्रास ही दूर होतो.हळदीमुळे अपचन शिवाय पोटाशी निगडित समस्या ही दूर ठेवता येऊ शकतात.