लग्नानंतर नवरीसोबत करवली का पाठवतात? जाणून घ्या या मागचे कारण?

विवाह हा एक अत्यंत महत्वपूर्ण असा संस्कार मानला जातो. प्रत्येक प्रांतात भागागणिक विवाहाशी निगडित भिन्न प्रथा व परंपरा अंगिकारल्या जातात. ख-या अर्थाने विवाहाची रंगत ही त्या विवाहामध्ये सामिल होणाऱ्या नातेवाईक ,मित्रमंडळी इत्यादींनी अधिक खुलून येते. विवाह मध्ये सहभागी होणाऱ्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांच्या चेष्टामस्करी व खट्याळ पणे मौजमस्ती करण्याचा केंद्रबिंदू हा नवरीची करवली असते.

नवरीची करवली ही प्रथा भारतातील अनेक भागांमध्ये पाळली जाते. नववधूच्या सोबत विवाह समारंभाच्या प्रत्येक विधीमध्ये तिला सोबत करणारी करवली ही नवरीची जवळची मैत्रीण किंवा बहीण असते.करवलीचा मान हा अगदी नवरीच्या मानाला साजेसा असतो.

नटून थटून आपल्या मैत्रिणीला किंवा बहिणीला सावलीप्रमाणे सोबत करणारी ,आपली सखी नववधू बनून दुसऱ्या घरात ,एका नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहे तिला नवीन आयुष्यामध्ये अनोळखी लोकांमध्ये बुजल्यासारखे होऊ नये, तेथील चालीरीती,प्रथा-परंपराना समजून घेताना नवरीने बावरून जाऊ नये व अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तिचा गृह प्रवेश व्हावा यासाठी जणू करवली नवरीची पाठराखीण बनलेली असते.

करवली या शब्दाचा शब्दशः अर्थ क-ह म्हणजे कलश आणि वली म्हणजे धरणारी असा होतो. करवली नवरी आणि नवरदेवाच्या सोबत मंगलमय असा कलश घेऊन वावरत असते ज्याला विवाहामध्ये  अनन्य साधारण असे महत्त्व असते व हा कलश पावित्र्याचे प्रतीक मानला जातो. 

पूर्वीच्या काळी अगदी लहान वयातच मुला-मुलींची लग्न करून दिली जात असत. काही मुली या सज्ञान होण्यापूर्वी त्यांची  लग्न करून दिली जात. अशा वयात न आलेल्या मुली नवीन घरातील प्रथा,परंपरा व रुढी जाणून. घेऊन घरातील ज्येष्ठांचा मान राखणे व नियमांचे पालन करून संसार करणे ही सर्व प्रक्रिया सुरळित चालावी यासाठी सोबत म्हणून नात्यातील एखादी समंजस स्त्री करवली म्हणून पाठवली जात असे। काही परिस्थितीमध्ये या समजदार स्त्रीला नवरी सोबत काही दिवस सासरी ठेवले जात असे.

आजही नवरीसोबत करवलीला पाठवण्याची प्रथा अनूक भागांमध्ये आहे.  आधुनिक काळामध्ये स्त्रिया त्यांचे शिक्षण ,नोकरी इत्यादी स्थिर झाल्यावर  कळत्या वयामध्ये विवाह करतात आणि ब-याचदा समाज मान्यतेनुसार लग्नाच्या अगोदर नवरदेव आणि नवरीची ओळखही झालेली असते व  विचारांची देवाणघेवाणही.होऊ लागते अशा परिस्थितीमध्ये नवीन घरात जुळवून घेणे तितके अवघड नसले तरीही करवलीला नवरीसोबत पाठराखीण म्हणून पाठवले जाते.करवलीचा उल्लेख असलेली अनेक पारंपारिक गीते हळद दळताना गायली जातात.पाठराखीण म्हणून गेलेल्या करवलीचा योग्य तो मान तिला कपडे व भेट देऊन नवरीच्या सासरच्या मंडळींकडून दिला जातो.