होय तुम्ही बरोबर ऐकलेय मी निवडणूक लढवणार:- आदित्य ठाकरे

0
35

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रत्यक्ष लढवणार असल्याची औपचारिक घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात त्यांनी जाहीर सभेत बोलताना सोमवारी ही माहिती दिली. ठाकरे घराण्यातून प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे ते पहिलेच नेते ठरणार आहेत. मला अनेकदा शिवसेनेच्या स्टाईलमध्ये महाराष्ट्राची सेवा कशी करता येईल, असा प्रश्न पडायचा. त्यामुळे आता मला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. तेव्हा सर्व शिवसैनिकांच्या परवानगीने आणि साक्षीने मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे कुटुंबातील निवडणुकीच्या मैदानात उतरणारे आदित्य ठाकरे हे पहिलेच नेते असणार आहेत. यापूर्वी ठाकरे कुटुंबातील कोणीही निवडणूक लढविलेली नाही. मुंबईत वरळी मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहणार आहेत.
आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यावर मेळाव्याला उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी टाळ्या वाजवून आणि ‘आदित्य ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊन त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. मुख्यमंत्री, आमदार बनण्यासाठी किंवा माझे स्वप्न साकार करण्यासाठी मी निवडणूक लढवणार नाही. तर मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. वरळीला जागतिक पातळीवर न्यायचे आहे. राजकारणात असल्यास एका निर्णयामुळे तुम्ही लाखो लोकांचं भविष्य घडवू शकता. त्यामुळेच मी निवडणुकीला उभा राहत आहे, असं आदित्य यांनी सांगितले.
आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती असतील. त्यामुळे शिवसेना त्यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हती. मात्र, मुंबईतील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा असणाऱ्या सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वरळीचा बालेकिल्ला आणखी भक्कम झाला आहे. त्यामुळे वरळीतून आदित्य यांना निवडणुकीच्या रिंगणातून उतरवण्यास कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.