fbpx

शेळीपालन कसे करावे

शेळीपालन व्यवसाय शास्त्रीय बाबींची माहिती न घेता इतर शेळीपालकाच्या यश पाहून कुठलेही नियोजन न करता सुरू केल्यास त्यात अपयश येण्याची जास्त शक्यता असते. शेळीपालन व्यवसाय यशस्वी किंवा अपयशी होण्यासाठी पुढील गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.

शेळीपालनातील तोट्याची कारणे –

1)शेळ्यांच्या गोठ्यावर अनावश्यक ठिकाणी मोठा खर्च करणे जसे, की सिमेंट काँक्रीटच्या अनावश्यक भिंती, कोबा बांधणे किंवा गव्हाणी बांधण्यावर खर्च करणे.

2) शेळ्यांची खरेदी अनोळखी ठिकाणावरून, खूप लांबून, जास्त प्रमाणात करू नये. यामुळे मरतूक वाढते व जास्त तोटा होतो.

3) शेळ्यांची निवड करताना त्यांची जात, जातगुणधर्म न पाहता करणे किंवा त्यांची अनुवंशिकता न तपासणे.

4) गाभण शेळ्या दूरवरून वाहतूक करून आणणे. वाहतुकीअगोदर, दरम्यान व नंतर आवश्यक काळजी न घेणे.

5) नवीन शेळ्या जुन्या शेळ्यांच्या कळपामध्ये मिसळणे.

6) शेळीपालनाची सुरवात २० + १ पेक्षा जास्त शेळ्यांनी करणे.

7) शेळ्या गोठ्यावर आणण्याअगोदर त्यांना लागणाऱ्या ओल्या, सुक्या चाऱ्याची सोय न करणे. शेळ्यांना लागणारा चारा आपल्या शेतात तयार न करता विकत घेणार असल्यास एकूण नफ्यामध्ये नक्की परिणाम होतो.

8)आवश्यक लसीकरण व जंतनिर्मूलनाकडे दुर्लक्ष करणे.

9) शेळीपालन सुरू करण्यापूर्वी यशस्वी व अयशस्वी शेळीपालकांच्या गोठ्यांना भेट न देता, त्यांच्या गोठ्यावरील चांगल्या व वाईट गोष्टींची कारणमीमांसा न करता शेळीपालनाची सुरवात मोठ्या संख्येने करणे.
10) आवश्यक नोंदी न ठेवणे. नोंदीचा विचार करून व्यवसायात आवश्यक बदल न करणे.

11) वेगवेगळ्या गटानुसार जसे, की बकरी ईदचा बोकड, पैदाशीचा बोकड व शेळ्या, मटणासाठीचा बोकड, जत्रेसाठीच्या बोकडाची विक्री त्यांच्या वजनानुसार न करणे.

12) गोठ्यामध्ये स्वच्छतेचा अभाव, शेळ्यांची गर्दी असणे व हवा खेळती नसणे, यामुळे शेळ्यांची मरतूक वाढू शकते.

13) गोठ्यामध्ये शेळ्यांच्या वेगवेगळ्या वर्गासाठी वेगवेगळी दालने नसणे जसे की, बोकड वेगळा न ठेवणे, गाभण शेळ्यांचे दालन, पिलांचे दालन किंवा भाकड शेळ्यांचे दालन इ.

14) पिलांना व्यायल्यानंतर २ तासांच्या आत त्यांच्या वजनाच्या १० टक्के चीक न पाजणे.

15) विक्री व्यवस्थापनाचा पूर्ण वर्षाचा आराखडा तयार नसणे जसे, की बाजारविक्री, जत्राविक्री, पैदासविक्री, बकरी ईद विक्री, ३१ डिसेंबर, गटारी, दसरा, धूलिवंदन या वेळची विक्री इ.

व्यवस्थापनातील बदल –
1 ) उपलब्ध साहित्याचा वापर करून कमीत कमी खर्चात चांगल्या पद्धतीने गोठ्याची रचना केल्यास हा व्यवसाय चांगला नफा मिळवून देऊ शकतो.
2) ज्या पिलांचे जन्मतःचे वजन चांगले आहे, अशांना वेगळे करून त्यांच्या जलद वजन वाढीसाठी आहार व्यवस्थापन करणे.

3) गोठ्यावरील आजारी शेळ्यांना वेळेत उपचार करून बरे होईपर्यंत त्यांना कळपातून वेगळे करणे.

4) शेळ्यांमध्ये काही विशिष्ट लक्षणे दाखवून मरतूक आढळली तर अशा शेळ्यांचे शवविच्छेदन करून मरतुकीची कारणे शोधून गोठ्यातील इतर शेळ्यांवर प्रथमोपचार सुरू करणे आवश्यक आहे.

4) शेळ्यांच्या दोन वेतांमधील अंतर शक्यतो ८ महिन्यांपेक्षा जास्त नसावे व पैदाशीचा बोकड दर ३ वर्षांनी बदलावा.

5) गोठ्यामधील साधारणतः एकूण संख्येच्या २० टक्के माद्या (ज्या आजारी पडणाऱ्या, १ पिलू देणाऱ्या, जातिवंत नसणाऱ्या, शांत नसलेल्या, वय झालेल्या व इतर) दर वर्षी नवीन गोठ्यामधीलच किंवा नवीन माद्यांनी बदल्याव्यात.

6) शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत असल्यास विमासंरक्षण घेणे आवश्यक आहे. जेणेकरून मोठे नुकसान टाळता येऊ शकते.

7) गोठ्यावर १५ ते ३० दिवसांतून एकदा तरी पशुवैद्यकाची भेट असावी, जेणेकरून व्यवसायातील त्रुटीवर योग्य सल्ला मिळू शकेल.

8) गोठ्यावरील काही निवडक शेळ्यांच्या रक्ताची व लेंढ्यांची चाचणी वर्षातून एकदा करावी. कारण त्यानुसार आवश्यक आहार, जंतनिर्मूलन औषध व प्रथमोपचार ठरवता येतो.

9) नफा वाढविण्यासाठी स्वच्छ मटणनिर्मिती व निर्यात याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

10) शेळ्यांना त्याच्या गाभणकाळात विशेष वाढता आहार व खुराक देणे बंधनकारक आहे. ज्यामुळे गर्भातील पिलांची वाढ व्यवस्थित होते.

11) शेळ्यांना नियमित चाटणविटांच्या किंवा पावडरच्या स्वरूपात आवश्यक खनिजमिश्रण मिळणे आवश्यक आहे.

12) शेळीपालनाची माहिती योग्य ठिकाणावरून घेऊन (प्रशिक्षण) मगच व्यवसायाची सुरवात करावी.

श्री .रामदास सूर्यवंशी