Home » झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून का जाऊ नये, यामागे आहे महाभारतातील ‘ही’ कथा…!
Spiritual

झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून का जाऊ नये, यामागे आहे महाभारतातील ‘ही’ कथा…!

जगभरात निरनिराळ्या संस्कृती मध्ये विविध प्रथांचे पालन केले जाते. या प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात. या प्रथांचे पालन करण्यासाठी आधार म्हणून पुराणात काही कथांची निर्मिती केली गेली जेणेकरून सामान्य माणसांमध्ये या प्रथांचे पालन करण्याचे महत्त्व समजावून सांगता येईल. अशीच एक परंपरा किंवा नियम म्हणजे भारतीय संस्कृतीत कधीही झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये असे सांगितले जाते व या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये यामागे महाभारतातील एक कथा आधार म्हणून सांगितली जाते. या कथेमध्ये महाभारत काळाचा संदर्भ आहे. पांडवापैकी सामर्थ्यशाली भीमाला आपल्या शक्तीचा गर्व झाला होता. या गर्वाने हरण करण्यासाठी साक्षात श्रीकृष्णाने बलाचे प्रतीक मानले जाणा-या हनुमानांची मदत घेतली. भिमाच्या जाण्याच्या रस्त्यामध्ये हनुमानांनी एका वृद्ध वानराचे रूप घेऊन रस्त्यातच झोपण्याचे सोंग घेतले.

यावेळी त्या ठिकाणाहून भीम जात होता. त्याला जाण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून त्याने या वानराला उठण्यास सांगितले. मात्र या वानराने त्याला आपल्याला उठता येत नाही व आपल्याला हलवावे असे सांगितले. यावर अहंकारी भिमाने वानराला हलवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यामध्ये अपयश आले. भीमाने हनुमानाला ओलांडून जाण्याचाही प्रयत्न केला मात्र ते सुद्धा त्याला जमले नाही.

शेवटी थकून भीमाने भगवान हनुमानांपुढे हात टेकले. त्या वेळी भगवान हनुमान आपल्या प्रत्यक्ष रूपात त्याच्या समोर आले. या प्रसंगातून भीमाने हा बोध घेतला की कोणत्याही व्यक्तीला दुर्बल समजता कामा नये व अहंकारी वृत्ती बाळगू नये. हे तत्व भीमाने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये बाळगले व आपल्या भावांनाही या तत्वाचे पालन करण्यास सांगितले. आजही झोपलेल्या व्यक्तीला ओलांडून जाऊ नये असे घरातील वडीलधारी माणसे सांगतात यामागे अहंकार न बाळगता संयमी आणि विनयशील वृत्तीने वागण्याची समज दिलेली आहे.