Home » ‘हार्डवेयरच्या दुकानात काम करण्यापासून ते सबवेचे संस्थापक’ वाचा फ्रेड डीलुका यांचा संघर्षमय प्रवास…!
Success

‘हार्डवेयरच्या दुकानात काम करण्यापासून ते सबवेचे संस्थापक’ वाचा फ्रेड डीलुका यांचा संघर्षमय प्रवास…!

कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी प्रेरणा खूप महत्त्वाची असते. अनेकदा केवळ आर्थिक अडचणी पोटी काही व्यवसाय उभारले जातात व त्यांना भविष्यामध्ये अगदी असामान्य यश मिळते. असाच एक व्यवसाय म्हणजे सबवे ही सँडविच बनवणारी फूड चेन होय. सबवे ही एक आंतरराष्ट्रीय फूड चेन आहे जिने संपूर्ण जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या शाखा उघडल्या आहेत.

मात्र या व्यवसायाची सुरुवात ही केवळ आपल्या रोजच्या आर्थिक कर्जा भागवण्याच्या उद्देशाने केली गेली होती असे सांगितले तर नवलच वाटेल. सबवेचा संस्थापक फ्रेड डिलुकाच्या दूरदृष्टीपणातून सबवेचा जन्म झाला मात्र यामागे त्याची पैशाची निकड ही प्रेरणा जास्त होती. फ्रेंड डिलुकाचा जन्म एका आर्थिक दृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबात ब्रुकलिन येथे १९४७ साली झाला.

फ्रेड डिलुकाला लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते मात्र त्याच्या परिवाराची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळत असूनही त्याला त्याचे हे स्वप्न अधुरे सोडावे लागले. यानंतर मानसशास्त्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते त्याचा मित्र पीटर हा सुद्धा त्याच्या जवळपासच राहत होता. एकदा त्याने फ्रेड व त्याच्या कुटुंबीयांना जेवणासाठी बोलवले त्यावेळी फ्रेड ने आपल्याला शिक्षणाच्या खर्चासाठी एखादा व्यवसाय करायचा आहे व त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले.

पीटरची आर्थिक परिस्थिती चांगली होती व त्याने त्याला 1000 डॉलर भांडवल म्हणून देण्याचे कबूल केले आणि त्याला सबमरीन सँडविच बनवून विकण्याची कल्पना दिली. याप्रमाणे पीटर आणि फ्रेंड डीलुका यांनी एकत्रितपणे पीटर्स सुपर सबमरीन ही चेन सुरू केली. सुरुवातीच्या काळात केवळ सहा डॉलर इतकेच पैसे त्याच्याकडे व्यवसाय उभारताना शिल्लक राहिले मात्र यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाचे नाव बदलून सबवे असे ठेवले.या व्यवसायामध्ये पहिल्याच वर्षी सात हजार डॉलर इतका नफा त्यांना मिळाला.

फ्रेड डिलुका हा एक खूप महत्वकांक्षी उद्योजक होता. वर्षभरामध्ये सबवेच्या 30 शाखा उघडण्याची त्याची मनीषा होती मात्र पहिल्या वर्षात सोळा शाखा उघडण्यात त्यांना यश मिळाले. 1978 सालापर्यंत सबवेच्या सुमारे 100 शाखा उघडण्यात त्यांना यश आले.सबवे हा संपूर्ण जगभरात विस्तारलेला व विविध विक्रम करणारा एक व्यवसाय आहे. सबवेची लोकप्रियता ही त्याच्या निरोगी पदार्थांमुळे व स्वच्छतेमुळे अधिक वाढली.

अमेरिकन लष्कराने सुद्धा आपल्या लष्करी तळांवर सबवेच्या सुमारे 17 शाखा उघडलेल्या आहेत. यापैकी पहिली शाखा 1987 साली पर्ल हार्बर येथे उघडली गेली होती. इटली हॉंगकॉंग, नॉर्वे, पाकिस्तान, भारत या सर्व देशांमध्ये सबवेच्या शाखा उघडल्या गेल्या आहेत व त्यांना तेथील खवय्यांची पसंती सुद्धा मिळते. आर्थिक दृष्ट्या सबवे हा कोट्यावधीची उलाढाल करणारा उद्योग बनला आहे.

फ्रेड डिलूका हा एक जिद्दी व महत्त्वकांक्षी उद्योजक होता व त्याच्यामध्ये नेतृत्वगुण अगदी ओतप्रोत भरलेले होते. त्याने व्यवसायाची व काळाची गरज लक्षात घेऊन सबवेमध्ये विविध बदल सुद्धा घडवून आणले. 2013 साली फ्रेड डिलूकाला ल्युकेमियाचे निदान झाले मात्र आपल्या मृ’त्यू अगोदर त्याने सबवेला एक प्रथितयश ब्रँड म्हणून सिद्ध केले आहे.