Tourism Travel

भारतात ‘या’ ठिकाणी रेल्वेप्रवासासाठी तिकीटाची आवश्यकता नाही! जाणून घ्या ह्या अजब गजब ठिकाणाविषयी.

भारतात ‘या’ ठिकाणी रेल्वेप्रवासासाठी तिकीटाची आवश्यकता नाही! जाणून घ्या ह्या अजब गजब ठिकाणाविषयी.

रेल्वेप्रवास हा आता अत्यंत सहजसोपा झाला आहे. तसेच भारतात जवळपास सर्वच भागांमध्ये रेल्वेचे जाळे पसरलेले असल्यामुळे देश जोडला गेला आहे. मात्र अनेकदा कमी अंतराचा प्रवास असेल किंवा लोकल रेल्वेने प्रवास करायचा असेल तर अनेकजण तिकीट न काढता रेल्वेने प्रवास करतात. अशावेळी रेल्वेत तिकीट तपासनीस आला आणि त्याने विनातिकीट रेल्वेत बसणाऱ्या प्रवाशाला पकडून दंड केला तर ही गोष्ट महागात पडते. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कि भारतामध्ये एक अशी रेल्वे आहे ज्या रेल्वेमध्ये बसून प्रवास करण्यासाठी तिकीट आकारले जात नाही.

ही रेल्वे भाखडा-नांगल या मार्गावरून धावते. भारतातील सर्वांत मोठे धरण म्हणून भाकडा(भाक्रा) नांगल धरणाची नोंद आहे हे आपण जाणतोच. पंजाबमधील नांगल या ठिकाणापासून हिमाचलमधील भाखडा या ठिकाणापर्यंत विनामूल्य रेल्वेप्रवास करता येतो. यासाठी प्रवाश्यांना कुठल्याही प्रकारचे तिकीट काढण्याची आवश्यकता पडत नाही.

भाखडा धरण हे भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वांत मोठे धरण मानले जाते. हे धरण पाहण्यासाठी भारतातील विविध ठिकाणांहून आणि विदेशातूनही पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे प्रवाश्यांच्या सोयीसाठी सदरील मार्गावरून ही ट्रेन मोफत चालवली जाते. ही मोफत रेल्वेसेवा १९४९ सालापासून सुरु करण्यात आली आहे. सदरील मार्गावर असणाऱ्या जवळपास २५ गावांतील लोकांनादेखील या मोफत ट्रेनचा लाभ घेता येतो.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळपास २ वर्षानंतरच ही रेल्वे सुरु करण्यात आली होती जी आजतागायत चालू आहे. या रेल्वेचे नियंत्रण बीबीएमबी (भाखड़ा ब्यास मैनेजमेंट बोर्ड) यांच्याकडे असून या सेवेसंदर्भातील सर्व कार्यभार हे बोर्ड बघते. सदरील बोर्डाची स्थापना ही धरणाचे बांधकाम करत असतानाच कामाच्या नियंत्रणासाठी केली गेली होती.

भाखडा आणि नांगल येथे धरण बांधण्यासाठी जमीन अधिग्रहित करताना स्थानिक रहिवाश्यांना विश्वासात घेऊन जमीन अधिग्रहण करण्यात आली होती. तसेच सदरील गावातील लोकांसाठी मोफत रेल्वे भाखडा ते नांगल यानुसार चालवली जाईल असेही आश्वासन बोर्डाकडून गावकऱ्यांना देण्यात आले होते. त्यानुसार आजही ही रेल्वे लोकांच्या सेवेसाठी मोफत चालवली जाते.

सदरील मार्गावर ही रेल्वे दिवसातून २ वेळा ये-जा करते. नांगलहून सकाळी ०७:०५ आणि दुपारी ०३:०५ वाजता भाखडासाठी निघते. तर भाखडाहून माघारी सकाळी ०८:२० आणि रात्री ०४:२० वाजता नांगलकडे निघते. या मार्गावरील अंतर कापण्यासाठी रेल्वेला १ तासाचा कालावधी लागतो. या रेल्वेमधील सीट ह्या लाकडापासून बनवलेल्या असून ट्रेनचे इंजिनदेखील इंग्रजांच्या काळातील आहे. या प्रवासात लागणार एक बोगदा आणि सतलज नदीवरील पूल ही नयनरम्य दृश्य पाहायला मिळतात.