Home » आपल्या जिवाची पर्वा न करता जायकवाडी धरण बांधण्याचे योगदान दिलेल्या शंकरराव चव्हाणांचा प्रवास
Travel

आपल्या जिवाची पर्वा न करता जायकवाडी धरण बांधण्याचे योगदान दिलेल्या शंकरराव चव्हाणांचा प्रवास

कोणत्याही देशाचे भवितव्य हे त्या देशातील द्रष्ट्या आणि दूरदृष्टी ठेवून वागणा-या राजकीय नेत्यांमुळे घडते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही व स्वहितापेक्षा देशहिताला प्राधान्य देऊन विधायक मार्गाने आपल्या अधिकारांचा वापर करणारे अनेक राजकीय व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राला लाभली आहेत. देशाचे भवितव्य हे शिक्षण, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांवर अवलंबून असते हे ज्या नेत्याने ओळखले तो नक्कीच आपल्या भूमीला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. शेत जमीन,उद्योग यांचेसाठी पाणी हा खूप महत्वपूर्ण घटक आहे.महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू जमिनीच्या पट्ट्यात पाण्याची गरज किती आहे हे सामान्य माणूस सुद्धा सांगू शकेल.

याच द्रुष्टीने महाराष्ट्रामध्ये अनेक लहान मोठी धरणे बांधली गेली.महाराष्ट्रातील धरणांपैकी एक महत्त्वाचे म्हणजे जायकवाडी धरण आहे. जायकवाडी धरण हे अनेक अंगांनी अभूतपूर्व आणि वैशिष्ट्यपूर्ण असे मानले जाते.जायकवाडी धरणाच्या निर्मितीमध्ये अनेक जणांचे मोठे योगदान आहे.  महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शंकरराव चव्हाण यांनी आपल्या जीवाला धोका असतानाही जायकवाडी धरणाची निर्मिती करण्याचा चंगच बांधला आणि आलेल्या मृत्यूला परतवून जायकवाडी धरण मराठवाड्याच्या जनतेसाठी खुले केले. आज आपण जायकवाडी धरणाच्या निर्मितीचा रोमांचक असा इतिहास आणि  शंकरराव चव्हाण यांचे अक्षरशः प्राणांची बाजी लावून जायकवाडी धरणाच्या निर्मितीत दिलेले योगदान याविषयी काही तथ्य जाणून घेणार आहोत.

१९७६ साली औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जायकवाडी  धरणाची निर्मिती करण्यात आली. मुख्यत्वे मराठवाड्यातील जमिनीची तहान भागवण्याचे उद्देश हा  जायकवाडी धरणाच्या निर्मितीमागे होता. जायकवाडी धरण हे नाथ सागर या नावाने सुद्धा ओळखले जाते. जायकवाडी धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता १०२ टीएमसी आहे. जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे पूर्णपणे मातीने बांधलेले धरण म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्णपणे मातीने बांधलेले धरण हे जायकवाडी धरणाचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे.

 1965 साली पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते जायकवाडी धरणाच्या बांधणीची सुरुवात झाली. जायकवाडी धरण  निर्माण करण्याचे स्वप्न तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी पाहिले होते. शंकरराव चव्हाण यांच्या या भव्य दिव्य आणि बहुपयोगी स्वप्नाच्या  आड सर्वच पक्षांचे विरोधक आले होते. जायकवाडी धरण बांधण्यासाठी शंकरराव चव्हाण यांना प्रचंड असा संघर्ष करून अग्निदिव्यातून जावे लागले होते.

शंकरराव चव्हाण यांना हे धरण बांधू नये यासाठी त्यांच्या विरोधकांनी अगदी सर्व स्तरांमधून विरोध केला होता. अक्षरशः त्यांना जीव घेण्याच्या धमक्या सुद्धा आल्या होत्या. 1965 साली एका संध्याकाळी शंकरराव चव्हाण यांनी केंद्रामध्ये पाठपुरावा करून जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी मंजुरी आणली. जायकवाडी धरणाच्या बांधण्याच्या मुहूर्ताच्या आधी एके दिवशी गाडीने शेवगावला जात असताना एका डोंगराळ ठिकाणी त्यांच्या गाडीच्या दिशेने मोठमोठे दगड डोंगरावरून घरंगळत खाली आले.

या जीवघेण्या अपघातापासून शंकरराव चव्हाण बचावले. मात्र हा अपघात नव्हता तर शंकरराव चव्हाण यांच्या घातपाताचा कट होता. हे डोंगरावरून घरंगळत येणारे दगड शंकरराव चव्हाण यांच्या गाडीवर पडून  त्यांच्या जीवावर बेतावे असा कट रचण्यात आला होता.मात्र  या  घातपाता पासून  शंकरराव बालंबाल बचावले मात्र इतके जीवघेणे संकट येऊन सुद्धा शंकररावजी यांनी जायकवाडी धरण बांधण्याचा आपला प्रयत्न सोडला नाही.

जायकवाडी धरणाचे एकूण 27 दरवाजे आहेत. जायकवाडी धरणाचा लोकार्पण सोहळा 1976 साली माजी पंतप्रधान दिवंगत श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाला. जायकवाडी धरण हे औरंगाबाद,अहमदनगर ,बीड ,परभणी ,जालना आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना शेती साठी पाणी आणि पिण्यासाठी पाणी पुरवू शकते. जायकवाडी धरणाची उंची ही 41.3 मीटर असून लांबी 9997 मीटर इतकी आहे.

आपल्या प्राणांचीही पर्वा न करता मराठवाड्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शंकरराव चव्हाण यांनी पाटबंधारे मंत्रीपदही भूषवले होते. त्यांनी कृष्णा -गोदावरी पाणी तंटा मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आणि सामंजस्याची भूमिका घेतली होती. शंकरराव चव्हाण यांचा जन्म हा पैठण येथे झाला व उच्चविद्याविभूषित असे ते मुख्यमंत्री होते. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात ही सक्रिय सहभाग घेतला होता.

जायकवाडी धरणाच्या बांधणीसाठी हजारो कुटुंबांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या व अनेक घरेही विस्थापित झाली. या विस्थापितांचे पुनर्वसन करणे हा मराठवाड्याच्या इतिहासातील विकासाचा व स्थित्यंतराचा एक महत्त्वपूर्ण टप्पा इतिहासामध्ये मानला गेला आहे.