Travel

दक्षिण काशी म्हणजे कुणकेश्वर! साक्षात भगवान शंकराच्या या स्थानाचा जाणून घेऊया इतिहास!

भगवान शंकर हे खरतर पृथ्वी निर्माता आणि पृथ्वी नष्ट ही करू शकतात इतकी ताकद ठेवणारे देव आहेत. आदी आणि अंत म्हणून भगवान शंकराकडे पाहिले जाते. त्यांच्या उपासने मोक्षप्राप्ती होते असे देखील हिंदू धर्मात समजतात. आज आपण त्यांच्या एका स्थानाचा इतिहास जाणून घेणार आहोत.

देवगडच्या दक्षिण बाजूला वीस किलोमीटरवर कुणकेश्वराचे क्षेत्र आहे. अतिशय निसर्गरम्य आणि धार्मिक असे हे धर्मस्थळ दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. श्री कुणकेश्वराचे मंदिर जिथे आहे त्याचे बांधकाम आणि किनार्‍यावर असणारे या मंदिराचे स्थान यामुळे मंदिराचे देखणेपण भारीच वाढलेले आहे.

सुबक नक्षी आणि मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले असावे असे तज्ञ मंडळी सांगतात. आता हे मंदिर कसे बांधले गेले किंवा याविषयीचा इतिहास काय ते आपण पाहू!

या मंदिराचा इतिहास सांगणारी एक दंतकथा अशी आहे की, एक अरब व्यापारी कोकण किनार्‍यावरुन जात असताना मोठे वादळ सुरु झाले. हे वादळ इतके भयानक होते की, त्याला समोरचे काही दिसेनासे झाले. त्याच्या जवळ असणारे त्याचे गलबत भरकटून गेले.

अशा संकटसमयी त्याला एक दूरवर लुकलुकणारा दिवा दिसला. तू किनाऱ्याच्या शोधात असल्याने घोंघावणार्‍या वादळातही तो न विझणारा दिवा पाहून व्यापारी अचंबित झाला. त्याने आपले गलबत त्या दिव्याच्या दिशेने नेले. किनाऱ्यावर आल्यावर त्याच्या लक्षात आले की, आपल्याला दिशा दाखवणारा हा दिवा म्हणजे या महादेवाच्या मंदिरातील छोटीशी पणती होती!

तो धर्माने वेगळा, त्याची संस्कृती वेगळी तरीदेखील या अनुभवाने तो कृतज्ञ झाला. त्याने असे निश्चित केले की, या मंदिराची मला व्यवस्थित उभारणी करायची आहे. आणि त्याने तिथे मंदिराची सुंदर अशी उभारणी देखील केली. त्याच मंदिराच्या बाजूला एक कबर आहे. देवाजवळ कुठलाच धर्म नसतो. त्यामुळेच हिंदू-मुस्लीम ऐक्याची कहाणी सांगणारे कुणकेश्वर हे खरंच पवित्र ठिकाण आहे.

इथे असणारी महादेवाची पिंड देखील भव्य असून ती निसर्गनिर्मित आहे असे देखील बोलले जाते. निसर्गरम्य ठिकाण असल्याने, श्रावणात दूरवरून भाविक आवर्जून महादेवाच्या दर्शनासाठी येतात. श्रावणात अनेक भाविक इथे येत असल्याने इथले वातावरण सुद्धा अगदी प्रफुल्लीत होते.