Being Maharashtrian

शिवनेरी किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा साक्षीदार

रांगड्या मावळ्यांची, कणखर ध्येयाची, राकट दगडाची भूमी मानलेल्या महाराष्ट्राच्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचाचे कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या गनिमांचा अनन्वित अत्याचार,यातना आणि छळाला सहन करण्याची जणू काही सवय लागलेल्या भोळ्याभाबड्या महाराष्ट्राच्या जनतेला या अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि स्वराज्याचे स्वप्न पहाण्याचे बाळकडू शिवाजी महाराजांनी दिले. तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रामध्ये  किती किल्ले आहेत ते? माहित […]

0
37
शिवनेरी किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा साक्षीदार

रांगड्या मावळ्यांची, कणखर ध्येयाची, राकट दगडाची भूमी मानलेल्या महाराष्ट्राच्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचाचे कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या गनिमांचा अनन्वित अत्याचार,यातना आणि छळाला सहन करण्याची जणू काही सवय लागलेल्या भोळ्याभाबड्या महाराष्ट्राच्या जनतेला या अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि स्वराज्याचे स्वप्न पहाण्याचे बाळकडू शिवाजी महाराजांनी दिले.

तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रामध्ये  किती किल्ले आहेत ते? माहित नसेल तर काही हरकत नाही पण महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मावळ्याला ह्या गोष्टीची माहित असायला हवी असं मला वाटत. महाराष्ट्र मध्ये जवळपास ३५० किल्ले आहेत. आत्ता सध्या यातील किती किल्ले व्यवस्थित असतील याची माहिती तर सध्या माझ्या कडे नाहीये. माहिती मिळाल्यास नक्की तुम्हाला कळवेळ.  चला तर मग बघुयात शिवनेरी गडाविषयी माहित नसलेल्या काही गोष्टी. 

शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या पवित्र शिवनेरी किल्ला हा पुण्याच्या उत्तरेकडे वसलेल्या जुन्नर जवळ आहे. पुण्यापासून साधारण १०५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. स्वराज्याच्या स्वप्नाची मुहूर्तमेढ रोवण्यात अढळ स्थान शिवनेरी किल्ल्याचे मानले जाते. काळाच्या ओघात व शत्रूचे आक्रमण, हवामान,वातावरणातील बदल हे सर्व पचवुन हा किल्ला आज सुद्धा स्थितप्रज्ञ पणे व एखाद्या ढाली प्रमाणे भक्कम उभा आहे, या मधुन या किल्ल्याच्या अद्भुत बांधकामाविषयी व वास्तुशास्त्राविषयी प्रचिती येते‌. 

19 फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. हा किल्ला मराठा स्वराज्याचा बालेकिल्ला मानला जात असे याला कारण म्हणजे हा किल्ला चढण्यास अतिशय कठीण असा किल्ला होता‌. याच्या चहुबाजूंनी तटबंदी होती. या किल्ल्याचा आकार नावाप्रमाणेच शंकराच्या पिंडीसारखा भासतो. या किल्ल्यावर शंकराचे मंदिर आहे. ब्रिटिश काळामध्ये सुद्धा या किल्ल्याच्या महत्त्वपूर्ण स्थानाची नोंद जॉन फ्रायर यांनी घेतली होती. त्यांनी या किल्ल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिधा सामग्री साठवून ठेवण्यात आल्याचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केला होता.

शिवनेरी किल्ला आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व तर निश्चितच आहे. मात्र अगदी इसवीसनपूर्व काळापासून या परिसराचे भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व सुद्धा खूप होते. इसवी सन पूर्व काळामध्ये शक राज्य या परिसरात विस्तारले होते. शकराजा नहपानाची ही राजधानी मानली जात असे. सातवाहनांच्या साम्राज्याच्या विस्तारामध्ये सातवाहनांचा राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा पराभव केला व त्यानंतर सातवाहनांची सत्ता या ठिकाणी स्थापन झाली. या काळामध्ये शिवनेरी किल्ल्याच्या आजूबाजूला असलेल्या नाणेघाटाला व्यापारी दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व होते.या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी निरनिराळ्या किल्ल्यांची निर्मिती व लेण्यांची निर्मिती केली गेली.

सातवाहनांनंतर चालुक्य व राष्ट्रकूट या त्या काळातील पराक्रमी सत्तांनी ही या परिसरामध्ये आपले साम्राज्य स्थापन केले मात्र शिवनेरीला खऱ्या अर्थाने गडाचे स्वरूप प्राप्त झाले ते तेराव्या शतकामध्ये यादव यांच्या साम्राज्य मध्ये. यादवांच्या साम्राज्य मध्ये शिवनेरी किल्ल्यावर खऱ्या अर्थाने राज्यकारभार केला जाऊ लागला.

शिवनेरी किल्ल्या ने सत्तांतराच्या अनेक खेळ्या व लढाया याची देही याची डोळा अनुभवल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या किल्ल्याच्या गादीवर अनेक बलाढ्य सत्ता आल्या व पायउतार सुद्धा झाल्या. १४४३ साली बहमनी राजवटीत  मलिकुल तुजार याने यादवांच्या सेवेतील कोळी सरदारांचा पराभव करून बहामनी राजवट शिवनेरी किल्ल्यावर सुरू केली 

मात्र बहमनी राजवटीच्या अंतानंतर याठिकाणी भारतीय राजकारणा मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निजामशाहीची स्थापना झाली. सन १४९३ साली निजामशाहीची राजधानी शिवनेरी गडावरून अहमदनगरला स्थानांतरीत झाली या ठिकाणी रक्ताच्या नात्यांमधील सत्तेसाठी चे हेवेदावे सुद्धा शिवनेरी गडा ने अनुभवले आहेत. पंधराशे पासष्ठ साली मुर्तजा निजाम याने आपल्या भाऊ कासीम याला या ठिकाणी अटकेत ठेवले होते.

१५५५ मालोजीराजे भोसले यांच्याकडे शिवनेरी गडाची जबाबदारी आली. त्याकाळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडल्या. १६२९ साली छत्रपती शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजामाता यांच्या वडिलांची हत्या झाली व त्यानंतर शहाजीराजे यांनी गर्भवती असलेल्या जिजामाता यांना सुरक्षेच्या कारणास्तव काही प्रामाणिक सरदारां सोबत जिजामाता यांना शिवनेरी गडावर रवाना केले. 

त्या ठिकाणी शिवाई देवीला जिजामाता यांनी आपल्या गर्भातील बाळाच्या सुरक्षेसाठी साकडे घातले व जर आपणास पुत्र झाला तर त्याचे नाव शिवाई देवीच्या नावावरून ठेवू असा नवस केला. व 19 फेब्रुवारी १६३० रोजी जिजामाता यांनी छत्रपती शिवरायांना जन्म दिला. 

गडावर जाण्याच्या वाटा :

जुन्नर गावामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक साखळी वाट आणि दुसरी सात दरवाजे मार्ग आहेत. 

साखळी वाट - जुन्नर बस स्टँड पासून एक किलोमीटर अंतरावर एक मंदिर लागते त्या मंदिराच्या समोरील रास्ता थेट किल्याच्या भिंतीपाशी पोहचतो भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने व पायऱ्यांच्या मदतीने गडावर जाण्यासाठी दीड तास लागतो.

सात दरवाजाची वाट - 

पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा होय. 

पहाण्याची ठिकाणे - 

शिवाई मंदिर, अंबरखाना, कोळी चौथरा, शिवकुंज, हमामखाना व कमानी मशीद, शिव जन्मस्थान, कडेलोट हे बघण्यासारखे ठिकाणे आहेत 

शिवाई मंदिर - 

शिवनेरी किल्ल्यावर सात दरवाज्यांच्या वाटेवर पाचवा दरवाजा, शिपाई दरवाजा, पार केल्यानंतर उजव्या बाजूला वळल्यास शिवाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर शिवनेरी किल्ल्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचे प्रतीक आहे.

मंदिरामध्ये शिवाई देवीची भव्य आणि सुंदर मूर्ती विराजमान आहे. ही देवी शिवनेरी किल्ल्याच्या रक्षक देवी मानली जाते. मंदिराच्या मागे कड्यात 6 ते 7 प्राचीन गुहा आहेत.

अंबरखाना - शिवनेरी किल्ल्यावर शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर अंबरखाना आहे. अंबरखाना हा पूर्वीच्या काळी किल्ल्यावरील धान्य साठवण्यासाठी वापरला जाणारा मोठा गोदाम होता.

कोळी चौथरा - अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकडीवर जाते. या टेकडीवर एक कोळी चौथरा आणि एक इदगाह आहे.

शिवकुंज - दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. शिवाजी स्मारक समिती ने शिवकुंज नावाचे स्मारक बांधले आहे. वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक जलाशय लागतात. पुतळ्यात जिजाबाई आणि बालशिवाजी यांचे सुंदर आविष्कार दिसतात. शिवाजी महाराज हातातील छोटी तलवार फिरवीत, आपल्या स्वप्नांची कल्पना आईसमोर मांडत असल्याचे दृश्य या पुतळ्यात दिसते. शिवकुंज हे केवळ एक स्मारक नसून, ते शिवाजी महाराजांच्या जीवनातील आदर्श आई-पुत्राच्या नात्याचे प्रतीक आहे.

हमामखाना व कमानी मशीद -  शिवकुंज समोर कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे टाकी आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.हमामखाना म्हणजे आंघोळीचं ठिकाण

शिव जन्मस्थान - शिवनेरी किल्ल्यावर हमामखानाकमानी मशीद पासून पुढे शिवजन्मस्थानाची ऐतिहासिक इमारत आहे. ही इमारत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचे पवित्र स्थान आहे. शिवजन्मस्थान इमारत दोन मजली आहे.
खालच्या मजल्यावर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तिथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे.
ही जागा मराठा साम्राज्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.

कडेलोट - शिवजन्मस्थान पासून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.

R
WRITTEN BY

Rohini Hajare

Responses (0 )