Home » कंगनाच्या विधानावर डॉ.अमोल कोल्हे यांनी संतप्त होऊन दिली अशी प्रतिक्रिया…
News

कंगनाच्या विधानावर डॉ.अमोल कोल्हे यांनी संतप्त होऊन दिली अशी प्रतिक्रिया…

भारतीय राजकारणामध्ये सध्या राजकीय हेवेदावे यांनी धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक स्वरूप घेतल्याचे दिसून येत आहे. या सर्व राजकीय मतभेद यांमध्ये कलाक्षेत्रातील कलाकारांनी सुद्धा उडी घेतल्याचे दिसून येते व यामधून काही गट निर्माण झाले आहेत.काही दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेली अभिनेत्री कंगना राणावत हिने अतिशय वादग्रस्त विधान केले होते.

यामध्ये तिने भारताला १९४७ साली भीक मिळाली होती खरे स्वातंत्र्य तर २०१४ साली मिळाले असे वक्तव्य केले होते.तिच्या या वक्तव्यावर सर्वत्र सडकून टीका झाली व ज्या घरांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गमावले त्या कुटुंबीयांच्या भावनांचा अपमान असल्याची भावना सुद्धा सर्व स्तरांमधून व्यक्त केली जात आहे.आश्चर्य म्हणजे कंगनाला काही जणांनी पाठिंबा दिला आहे यामध्ये विक्रम गोखले यांसारखे दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी कंगनाचे म्हणणे हे अगदीच खरे असल्याचे म्हटले आहे.

मात्र कंगनाच्या या बेताल वक्तव्यावर आक्षेप घेणारे सुद्धा काही कलाकार आहेत व यामध्ये आवर्जून उल्लेख केला जाऊ शकतो ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राला सर्व महाराष्ट्रामध्ये पोचवणारे अभिनेते व सध्या राजकारणामध्ये खासदारकीची भूमिका समर्थपणे पेलणारे डॉक्टर अमोल कोल्हे होय.

डॉक्टर अमोल कोल्हे राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली लोकप्रतिनिधीची जबाबदारी अतिशय सक्षम पणे पार पाडली आहे.काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी सार्वजनिक जीवनापासून थोडेसे दूर राहण्याचे ठरवले होते मात्र आता पुन्हा एकदा ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत व एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी कंगनाच्या या बेताल विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

यामध्ये त्यांनी भारतीय राजकारणामध्ये निर्माण झालेल्या गटांवर चिंता व्यक्त केली व या अभिनेत्रीने केलेले विधान हे एका संकुचित मानसिकतेमधून आल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.या अशा विधानांमुळे ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये हौतात्म्य पत्करले आपल्या प्राणांची बाजी लावली त्यांच्या त्यागाचा हा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यावेळी त्यांनी बाबू गेनू सारख्या स्वातंत्र्यसैनिकांचा ही उल्लेख केला आहे.अमरावती मध्ये घडलेल्या हिंसाचाराला त्यांनी दुर्दैवी असल्याचे म्हटले व राजकीय स्वार्थासाठी सामाजिक शांतता भंग होऊ देऊ नये असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.