Home » समृद्धी महामार्गावर का होतायेत वारंवार अपघात, जाणून घ्या या मागील धक्कादायक खुलासा…!
News

समृद्धी महामार्गावर का होतायेत वारंवार अपघात, जाणून घ्या या मागील धक्कादायक खुलासा…!

डांबरी आणि सिमेंट रस्ता यामध्ये बेसिक फरक आहे. डांबरी रस्त्यावर गाडीचे वजन जेव्हा पडते तेव्हा तो किंचित दबला जातो आणि टायरची ग्रीप रस्त्यावर व्यवस्थित बसते. त्यामुळं गाडी रस्त्याला धरून चालते आणि टायर गरम होत नाही. सिमेंट रस्त्यावर गाडीचे वजन पडल्यावर रस्ता दाबत नाही त्यामुळं गाडीला समोर जाण्यासाठी घर्षण करावे लागते त्यामुळे टायर गरम होतात त्याचबरोबर ब्रेकिंगसाठी देखील जास्त वेळ आणि अंतर लागते.

डांबरी रस्त्यावर ज्या स्पीडने गाडी चालवतो त्याच्या दहा पंधरा टक्के कमी स्पीडने सिमेंट रस्त्यावर गाडी चालायला पाहिजे. परंतु आपण याच्या उलट करतो. तयार मध्ये हवा योग्य नसने, तयार कमकुवत असणे त्याचबरोबर रस्ता मोकळा असल्यावर वेग जास्त स्पीडने गाडी चालवणे. हा मोह चालकाने नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर ओव्हरस्पीड, ओव्हरलोड, लेन कटिंग, ओव्हरटेक हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

वरील या सर्व गोष्टी अपघाताला कारणीभूत ठरतात. पुणे मुंबई द्रुतगती हा देखील सिमेंटरस्ता आहे परंतु या मार्गाचा पल्ला अतिशय कमी आहे कारण या रस्त्यामध्ये टोलनाके,वळणे, घाट आणि वाहतूक असल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी आहे. समृद्धी महामार्गाच्या डिझाईन मध्ये काही चूक असती तर काही ठिकाणीच अपघात व्हायला हवे होते. परंतु तसे नाहीये हे लक्षात येत असेल तर साप साप भुई धोपटाने हे मात्र चुकीचे आहे.

30 जून 2023 ची रात्र  समृद्धी महामार्गावरील एका खाजगी बसने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी काळरात्र ठरली. महाराष्ट्राच्या दळणवळण व‌ वाहतुकीच्या क्षेत्रातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर अपघात सातत्याने होत आहेत ही चिंतेची बाब आहे.

महाराष्ट्राची राजधानी असलेले मुंबई व उपराजधानी असलेले नागपूर यांना अतिशय वेगवान पद्धतीने जोडणारा समृद्धी महामार्ग पहिल्या टप्प्यामध्ये शिर्डी ते नागपूर असा‌ खुला केल्यानंतर 100 दिवसांत 900 अपघात घडल्याचे आकडेवारीमध्ये दिसून येत आहे यामध्ये 31 जणांचा बळी गेला आहे.

प्रगत तंत्रज्ञान व संसाधनांचा वापर करून निर्माण करण्यात आलेल्या समृद्धी महामार्गावरील सातत्याने होणा-या अपघातांची कारणमिमांसा करण्यासाठी नागपूरच्या अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी काही बाबी संशोधनाद्वारे अधोरेखित केल्या आहेत.

हायवे हिप्नोसिस किंवा महामार्ग संमोहन : महामार्गावर वाहनचालकांना अनेकदा हायवे संमोहनाचा अनुभव येतो. एका सरळ रेषेत गाडी चालवत असताना काही काळानंतर चालकाला संमोहनाची अवस्था निर्माण झाल्याचा अनुभव येतो. एका सरळ रेषेत या अवस्थेत चालक गाडी चालवू शकतो मात्र त्याला त्या विशिष्ट कालावधीमध्ये घडलेला घटनाक्रम आठवत नाही व यामुळे अशा अवस्थेत गाडीला ब्रेक लावणे किंवा वेग कमी करणे यांसारख्या क्रिया अचानक करणे संबंधित चालकाला शक्य होत नाही किंबहुना यासंदर्भात संदेशवहन शरीरात निर्माण होण्यास अडथळे निर्माण होतात व परिणामी अपघात घडतात. समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहनांच्या चालकांनी हा अनुभव आल्याचे नमूद केले आहे.

महामार्गावरील लेनच्या बाबत होणारी गल्लत : समृद्धी महामार्गावर तीन लेन आहेत व यामध्ये बहुतेक वेळा पुढील वाहनाने नियमांचे पालन न‌ करता लेन बदलली तर मागील वाहनाला काही सेकंदामध्ये आपल्या वाहनाच्या वेगावर नियंत्रण करणे शक्य न झाल्यामुळे साइड डॅश होऊन अपघात घडतो. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर घडलेल्या अपघातांमध्ये चाळीस टक्के अपघात साइड डॅश मुळे झाल्याचे समोर आले आहे.

महामार्गावरील वळणे : समृद्धी महामार्गावरील वळणांची संख्या कमी असली तरी या वळणांवर गाडी चालवताना जागरुक असणे गरजेचे आहे. गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे वळणावर अपघात घडतात. या महामार्गावर मालवाहू, जड वाहनांसाठी वेग मर्यादा 80 तर अन्य वाहनांसाठी 120 प्रति किमी इतकी आहे. वळणांवर वेग कमी न झाल्यामुळे सुद्धा अपघात घडतात.

वाहनांचे टायर्स /चाके : वाहनांच्या चाकांची अवस्था खराब असणे हे सुद्धा समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्ग हा सिमेंटने निर्माण करण्यात आला आहे व या रस्त्यावर वाहनांच्या चाकांचे घर्षण अधिक होऊन तापमान वाढल्यामुळे चाक फुटण्याचा धोका निर्माण होतो.

या प्रमुख कारणां व्यतिरिक्त अन्य काही कारणे म्हणजे वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड, गाडी चालवत असताना मोबाइलचा वापर इत्यादी होय. महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी यांच्यामध्ये समृद्धी महामार्गाद्वारे तब्बल 24 जिल्हे एकमेकांना वेगवान पद्धतीने जोडून रोजगार, व्यवसाय, दळणवळण, यांच्या संधी निर्माण करण्याचे द्रष्टे धोरण योजनाकर्त्यांचे आहे मात्र पहिल्या टप्प्यामध्ये निर्माण झालेल्या  वाढत्या अपघातांच्या आवाहनावर ठोस उपाययोजना करणे ही सध्याची प्राथमिक गरज  आहे.