Home » एकेकाळी कमी उंचीमुळे लोक करायचे चेष्टा, आज आहे एक यशस्वी वकील…!
Success

एकेकाळी कमी उंचीमुळे लोक करायचे चेष्टा, आज आहे एक यशस्वी वकील…!

बॉडी शेमिंग ही वृत्ती अगदी झपाट्याने वाढताना दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकदा आपण सेलिब्रिटीज प्रमाणे अगदी सर्व सामान्य व्यक्तींनाही त्यांच्या शरीराची उंची आकार ठेवण रंग यांच्या वरून ट्रोल केल्याचे पाहिले जाते. या ट्रोलिंगमुळे काही व्यक्ती खूप गंभीर अशा नैराश्यामध्ये जातात तर काही व्यक्ती या बॉडी शेमिंगला आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा ट्रिगर पॉइंट म्हणून कामाला लागतात.

निसर्गतः वाट्याला आलेल्या शरीराला आपले बलस्थान बनवतात. याचे अगदी मूर्तीमंत उदाहरण म्हणजे हरविंदर कौर ही आत्तापर्यंतची उंचीला सर्वात कमी असलेली वकील होय. जलंदर येथील न्यायालयात हरविंदर कौर सध्या गुन्हेगारी खटले चालवणारी वकील म्हणून कार्यरत आहे. 2020 साली हरविंदर ने आपल्या कायद्याचे शिक्षण पूर्ण केले व तेव्हापासून ती या पेशा मध्ये कार्यरत आहे.

हरविंदर कौर हिची निसर्गतः उंची तीन फूट 11 इंच इतकी आहे. हरविंदर ही कमी उंची असलेली वकील नसून ती एक पॉझिटिव्ह वकील आहे असे तिच्या संपर्कात आलेले सर्वजण म्हणतात. आपल्या उंचीमुळे हरविंदरला आयुष्यामध्ये अनेक तडजोडी कराव्या लागल्या मात्र या तडजोडींमधूनच तिने नेहमीच एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेगळी वाट चोखाळत राहण्याचे ठरवले.

हरविंदरचे आई-वडील व एक लहान भाऊ हे तिघेही उंचीला सर्वसामान्य आहेत मात्र केवळ तिची उंची वाढत नसल्यामुळे आई-वडिलांनी तिला अनेक डॉक्टरांना दाखवले अनेक औषध उपचार केले मात्र यात कोणत्याही उपायाचा फरक पडला नाही. त्यावेळी हरविंदर खूप निराश झाली होती. आपल्याच बाबतीत असे का व्हावे हा प्रश्न तिला नेहमी भेडसावत असते व यामधूनच ती नैराश्याच्या गर्तेत गेली.

अनेक दिवस तिने स्वतःला एका खोलीत नैराश्यात कोंडून घेतले. हरविंदरला लहान असताना हवाई सुंदरी बनायचे होते मात्र हवाई सुंदरी होण्यासाठीच्या निकषांमध्ये उंचीच्या निकषांमध्ये तिची कमी उंची बसत नव्हती व परिणामी तिला आपले हे स्वप्न नाईलाजाने सोडून द्यावे लागले मात्र यानंतर तिने वकील होण्याची इच्छा बाळगली व अगदी यशस्वीपणे आज ती आपल्या व्यवसायामध्ये कार्यरत आहे.

केवळ वकील म्हणूनच न थांबता न्यायाधीश होण्याचे स्वप्न आता हरविंदर ला पूर्ण करायचे आहे. वकिल बनण्यापर्यंतचा हरविंदर चा प्रवास हा निश्चितच सहज व सोपा नव्हता. तिची उंची हा तिच्या कामातील अडथळा बनू शकतो असे तिला वारंवार लोकांकडून ऐकायला मिळत असे. मात्र वकील बनल्यानंतर तिच्या पेशातील सर्वच वकिलांनी तिला नेहमीच सहकार्य केले मात्र आजही काही लोक हे तिच्या उंचीमुळे तिच्या केस लढण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात तेव्हा तिला संकोचल्यासारखे वाटते असे ती कबूल करते.