Home » अशी आहे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची संघर्ष गाथा…!
Infomatic

अशी आहे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची संघर्ष गाथा…!

अनाथ लेकरांची माय बनून त्यांचे गोकुळ वसवणाऱ्या माई अर्थातच डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ मुलं,गोरगरीब,रस्त्यावर सोडून दिलेल्या गाई यांच्या कणवेपोटी आपले संपूर्ण आयुष्य या सर्वांची माता बनून राहण्यामध्ये धन्य मानले.सिंधुताई सपकाळ यांनी केलेले समाज कार्य हे नेहमीच खूप उल्लेखनीय राहिले आहे,ते का या प्रश्नाचे उत्तर त्यांनी इथपर्यंत येतानाच्या जीवन प्रवासामध्ये झेललेल्या हाल-अपेष्टा,यातना अपमान व अवहेलनांमधूनही तावून-सुलाखून गाठलेला हा पल्ला होय.आज आपण डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन प्रवासाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म हा वर्ध्यातील नवरगाव या गावचा.सिंधुताईंना चिंधी या नावानेच हाक मारली जात असे.वडिलांचा सिंधुताईंवर प्रचंड जीव होता.सिंधुताई सपकाळ यांच्या कुटुंबाचा व्यवसाय गुरु राखण्याचा होता.तीन भावंडांमध्ये  वाढत असलेल्या सिंधुताईंना शिक्षणाची ओढ होती.चौथीपर्यंत शिकल्यावर त्यांचे वडील अभिमान साठे यांना त्यांनी खूप शिकावे अशी इच्छा होती मात्र त्याकाळी मूलींनी‌ शिकण्याची पद्धत नव्हती व म्हणूनच त्यांच्या आईने त्यांना गुरे राखण्याच्या कामाला लावून दिले.तरीही मराठी वाचणे शिकल्यामुळे त्यांना वाचनाची कवितेची आवड लागली.वडिलांनी लहानग्या सिंधुताईंचे नाव शाळेमध्ये घातले होते मात्र त्यांची स्वतःची आईच शिक्षणाच्या बाबतीत त्यांची वैरी ठरली होती.

त्यांच्या आईने सिंधुताईंनी शाळेत जाऊ नये म्हणून त्यांना म्हशींच्या मागे राखण करण्यासाठी पाठवून दिले.सिंधुताई सुद्धा सुरुवातीपासून अतिशय जिद्दीच्या होत्या.म्हशींना पाण्यामध्ये सोडून मग त्या शाळेमध्ये जात असत. शाळेतील गुरुजीना याची खबरबात नव्हती.मात्र एकदा पाण्यामध्ये सोडून दिलेल्या म्हशी एका शेतकऱ्याच्या शेतात शिरल्या आणि तो शेतकरी थेट शाळेत आला व चिंधी विषयी विचारू लागला.त्यावेळी त्यांच्या शिक्षकांना कशा परिस्थितीमध्ये सिंधुताई शिक्षण घेत आहे हे कळले व त्यांचे मन द्रवले.एकीकडे शिक्षणाचा मार्ग सुकर होत होता मात्र त्यांच्या आईने त्यांच्या शिक्षणामध्ये खोडा घालायचा ठरवला व वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न पस्तीस वर्षे वयाच्या श्रीहरी सपकाळ यांच्या सोबत लावून दिले.

लग्नापूर्वी वाचनामध्ये कवितांमध्ये रमणाऱ्या सिंधूताई यांच्यामागे विवाहानंतर मात्र यातनांचे दुष्टचक्र सुरू झाले.सिंधुताईंचा स्वभाव मुळातच अन्यायाविरुद्ध लढण्याचा होता.सासरी सुद्धा सिंधुताईंना गुरे राखण्याचे काम करावे लागत असे.गुराढोरांचे शेण काढावे लागत असे श्रीहरी सपकाळ यांना आपल्या पत्नीने वाचन केलेले आवडत नसे कारण त्यांचे स्वतःचे शिक्षण झालेले नव्हते.भरीसभर म्हणजे सिंधुताई काही वाचायला लागल्या तर त्यांच्या घरातील मंडळी सुद्धा पतीचे कान भरून देत असत. यावर उपाय म्हणून वाचना प्रतीच्या अतीव ओढीमधून सिंधुताईंनी शक्कल लढवली.वाण सामानाचे कागद त्या जपून ठेवत असत व ते जपून ठेवण्यासाठी उंदराच्या बिळाचा वापर करत असत.

उंदीर हे कागद अगदी आत पर्यंत घेऊन जात असत व हे कागद मिळण्यास सिंधुताईंना मुश्कील होत असे.एकदा त्यांना एक भले मोठे उंदराचे बीळ दिसले व त्यांनी त्या ठिकाणी गदिमांची कविता असलेला कागद जपून ठेवला.पाण्याला जाताना हा कागद सोबत घेऊन जाऊ व ही कविता वाचून काढू असा त्यांचा विचार होता हा कागद काढण्यासाठी जेव्हा सिंधुताईंनी त्या बिळा मध्ये हात घातला त्यावेळी त्या ठिकाणी उंदीर नव्हे तर एक भलेमोठे मुंगूस होते.या मुंगसाला सिंधुताईंचे हाताचे बोट म्हणजे सापच वाटला व त्याने सिंधुताईंच्या बोटाला चावा घेतला.सिंधुताईंनी मात्र वाचना वरील प्रेमामुळे ही वेदना सुद्धा सहन केली व त्या पूर्ण ताकदीनिशी तो कागद मिळवला.

गदिमांच्या ओळी त्या वाचत होत्या व त्यावर पडणाऱ्या रक्ताच्या धारेने जणू त्या ओळी त्यांच्या अगदी हृदयापर्यंत झिरपत होत्या. सिंधुताईंनी केलेल्या भाषणांमध्ये अनेक कविता त्यांच्या तोंडपाठ असलेल्या दिसून येतात त्या यामुळेच.त्यांचा स्वभाव हा अन्यायाविरुद्ध लढण्याचा होता.याची सुरुवात झाली ती त्यांच्या वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी. वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्यांची तीन बाळंतपणं झाली होती व त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या.गावामध्ये जवळपास सर्वच घरांमध्ये गुरे राखली जात असत व गुरांचे शेण हा तेथील कंत्राटदार विकत असे.हे शेण भरून देण्याचे काम गावातील बायकांनाच करावे लागे. हे शेण भरून देताना बायकांचा जीव अगदी मेटाकुटीला येत असे मात्र याची मजुरी त्यांना मिळत नसे.

या अन्यायाविरुद्ध सर्वात प्रथम सिंधुताई लढल्या.त्यांनी आपले म्हणणे त्यावेळेच्या कलेक्टर रंगनाथन यांच्यासमोर मांडले. कलेक्टरांना सिंधुताई यांचे म्हणणे पटले व गावातील बायकांना त्यांचा हक्क मिळाला सर्वत्र सिंधुताईंची वाहवा झाली मात्र हे गावातील कंत्राटदारासोबत दलाली साठी मध्यस्थ असलेल्या जमीनदार दमडाजीला फारसे भावले नाही व त्याचा अहंकार दुखावला गेला.सिंधुताईंना अद्दल घडवण्यासाठी त्याने सिंधुताईंच्या पोटातील मूल हे आपले असल्याचे त्यांच्या पतीच्या डोक्यात भरून दिले व या संशयाने सिंधुताईंच्या पतींनी दिवस भरलेल्या सिंधुताईंना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व गोठ्यामध्ये मरण्यासाठी सोडून दिले.

या अशा बेशुद्धावस्थेत सिंधुताईंनी एका मुलीला जन्म दिला व त्या वेळी ज्या गाईने त्यांचे रक्षण केले त्या गाईच्या रक्षणासाठी आपण कायम पुढे राहू ही शपथ सुद्धा घेतली .या शपथेला जागूनच त्यांनी गोरक्षणसाठीच्या संस्था काढल्या व याद्वारे जवळपास साडेसातशे गाईंचे संरक्षण त्या करत होत्या. त्यांच्याकडे असलेल्या गाई दुभत्या गाई नव्हत्या तर त्या सोडून दिलेल्या गाई होत्या.नव-याने घराबाहेर काढून दिलेली बाई म्हणून गावातील लोकांनी सुद्धा सिंधुताईंना गावाबाहेर हाकलले. त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते व सख्या आईने सुद्धा त्यांना विहिरीत किंवा एखाद्या गाडीखाली जीव देण्याचा सल्ला दिला.जवळच्या लोकांनी पाठ फिरवल्यानंतर रेल्वे स्टेशनवर भीक मागून गाणी म्हणत आपल्या दहा दिवसांच्या बाळासोबत सिंधुताई स्वतःची गुजराण करत होत्या.

या ठिकाणी दिवसभर ट्रेनमध्ये गाणी म्हणत जो काही भाकरतुकडा मिळत असे तो त्या आपल्या सोबत स्टेशनवर राहणाऱ्या भिका-यांसोबत एकत्र मिळून खात असत.या काळामध्ये जवळपास तीनदा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी त्यांना आपल्या जगण्याचे उद्दिष्ट काहीतरी वेगळे आहे याचा साक्षात्कार होत गेला.सिंधुताईनी आपल्या आयुष्यामध्ये सहन केलेल्या हाल-अपेष्टा तर खूप अपरिमित आहेत.सोळा दिवसांच्या तापलेल्या बाळाला घेऊन एका स्मशानामध्ये भुकेल्या पोटी सिंधुताई बसल्या होत्या आता आपल्या जगण्याला काही अर्थ नाही म्हणून त्या जीव देण्याचाही विचार करत होत्या.

अशाच वेळी स्मशानभूमीमध्ये कोणीतरी फेकलेले पीठ त्यांच्या दृष्टीस पडले त्या पिठाची त्यांनी झाडाच्या पानांवर प्रेताच्या बाजूच्या मडक्यातील पाण्याने भाकरी थापली व जळत्या चितेवर ही भाकरी भाजून ती खाली सुद्धा.सिंधुताईंना समाजातील ज्या घटकांना आपली गरज आहे त्यांच्यासाठी जगण्याची प्रेरणा या प्रसंगांनीच  दिली.सिंधुताईंना अनेक कविता भजन अगदी तोंडपाठ होते व ही भजन त्या आपल्या उदरनिर्वाहासाठी वापरत असत. रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये त्या भजन म्हणत असत व या भजनाच्या कार्यक्रमांमधून मिळणाऱ्या जेवणावर आपली गुजराण करत असत. मात्र हे असे किती दिवस चालणार हा प्रश्न त्यांना सतावत असे.

1994 साली सिंधुताईंनी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे ममता सदनची स्थापना केली. त्यांनी सर्वात प्रथम दीपक या मुलाला दत्तक घेतले.स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या हालअपेष्टा ,अपमान यामुळे समाजातील इतर अनाथ ,दुर्बलांची माता होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची स्वतःची मुलगी ममता हिला त्यांनी पुण्यातील सेवासदन शाळेत दगडूशेठ हलवाई संस्थांनच्या माध्यमातून  घातले व त्यांनी हजारो अनाथांची माता होण्याचे शिवधनुष्य उचलले .या संस्थेमध्ये अनाथ, गोरगरीब मुलांना जेवण ,खाणे पिणे, शिक्षण कपडेलत्ते यांची सोय केली जाते.

पण या व्यतिरिक्त या संस्थेतून बाहेर पडल्यावर आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक शिक्षणही त्यांना दिले जाते.विवाहयोग्य तरुण-तरुणींना योग्य जोडीदार मिळावा म्हणून ही संस्था प्रयत्न करते. आतापर्यंत हजारो मुलांना या संस्थेने स्वतःच्या पायावर उभे केले आहे व नवीन आयुष्य दिले आहे. केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशातही सिंधुताईंच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. परदेशातूनही त्यांच्या या कार्यासाठी आर्थिक मदत दिली जाते .सिंधुताईंनी भारताप्रमाणेच परदेशात सुद्धा आपल्या कार्यासाठी निधी मिळावा म्हणून अनेक दौरे केले. यासाठी त्यांनी मदर ग्लोबल फाऊंडेशन ची स्थापना केली.

सिंधुताईंनी अतिशय निर्व्याज पणे अनाथांची माय होण्याचे कार्य हाती घेतले होते.मात्र त्यांच्या या कार्याची उतराई म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यापैकी काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे 2021 साली त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. या अगोदर महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,अहिल्याबाई होळकर पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले होते.

कला क्षेत्राने सुद्धा सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेतली व त्यांचे अतिशय वास्तववादी चित्रण चित्रपटांद्वारे केले आहे.मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला.या चित्रपटामध्ये सिंधुताईंचे आयुष्य दाखवले गेले होते.या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.