Home » बियर पिल्याने खरचं मुतखडा बरा होतो का? जाणून घ्या यामागील सत्यता…!
Health

बियर पिल्याने खरचं मुतखडा बरा होतो का? जाणून घ्या यामागील सत्यता…!

आधुनिक काळामध्ये वैद्यकीय शास्त्राने खूप प्रगती केली आहे व त्याच बरोबरीने विविध आजारांविषयी सामान्य माणसांमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण झाली आहे. आपल्या आरोग्याविषयी प्रत्येक जण सध्या खूपच काळजी घेताना दिसत आहे. मात्र या मध्ये सुद्धा काही वेळा आजारांना आमंत्रण दिले जाते व अशावेळी इंटरनेट, यूट्यूब  याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर अनेकजण संबंधित रुग्णाला काही घरगुती उपाय करण्याचे सल्ले देतात.

ते घरगुती उपाय काही वेळा उपयुक्त ठरतात मात्र अनेकदा यामुळे आजार बळावण्याची सुद्धा शक्यता निर्माण होते. असाच एक आजार म्हणजे मुतखडा होय. मुतखडा हा एक अतिशय वेदनादायी आजार आहे व यापासून सुटका मिळवण्यासाठी बियर पिण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. बियर पिण्यामुळे मुतखडा निघून जातो असे म्हटले जाते मात्र या बाबींमध्ये कितपत तथ्य आहे हे अजूनही संशोधना मधून सिद्ध झाले नाही.

मात्र बियर घेण्यामुळे मुतखडा या आजाराच्या बळावण्याचेही प्रमाण काही टक्के असल्याचे सिद्ध नक्कीच झाले आहे. मुळात मुतखडा हा आजार का होतो तर मलमूत्र विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये जर क्षार आणि कॅल्शियम शरीरातून उत्सर्जित न होता साठवून राहिले तर त्याचे रूपांतर खड्यामध्ये होते व यामुळे मूत्रविसर्जनास त्रास होणे, मूत्र विसर्जनाच्या जागी संसर्ग होणे ,आग होणे, जळजळ होणे व प्रचंड वेदना जाणवणे ही लक्षणे निर्माण होतात.

मुतखड्यासाठी वैद्यकीय शास्त्रामध्ये ऑपरेशन पासून ते औषध उपचारांपर्यंत अनेक उपाय सांगितले गेले आहे मात्र अगदी हमखास सांगितला जाणारा व रामबाण मानला जाणारा उपाय म्हणजे बियरचे सेवन होय. बियरमुळे मुतखड्याचा आजार अधिक बळवण्याची शक्यता असते कारण यामध्ये असलेल्या काही घटकांमुळे कॅल्शियम अधिक प्रमाणात निर्माण होते व परिणामी पुन्हा एकदा मुतखडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते.

बियर मध्ये उष्मांक खूप जास्त असतात त्यामुळे कोलेस्टेरॉल वजन वाढीचा ही धोका निर्माण होतो. कोणत्याही अल्कोहोल युक्त पदार्थाचे सेवन केले असता शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी होते व परिणामी डीहायड्रेशन ची स्थिती निर्माण होऊन जाते. डीहायड्रेशन हे मुतखड्याच्या आजारामध्ये अजिबातच योग्य नाही.

म्हणूनच कोणत्याही डॉक्टरी सल्ल्याशिवाय लवकरात लवकर मुतखड्यापासून आराम मिळावा म्हणून बियरचे सेवन करण्याऐवजी काही खबरदारीचे उपाय पाळणे आवश्यक ठरते. मुतखड्याचा आजार होऊ नये किंवा त्यापासून आराम मिळावा यासाठी पाण्याचे भरपूर सेवन करणे व लघवीस वेळेवर जाणे या दोन उपायांचे पालन केले तरीही खूप फरक पडू शकतो.