Home » बिग बॉसच्या सिझनचा विजेता एम. सी. स्टॅन नक्की आहे तरी कोण?
Success

बिग बॉसच्या सिझनचा विजेता एम. सी. स्टॅन नक्की आहे तरी कोण?

हिंदी टेलिव्हिजन वरील बिग बॉस हा शो नेहमीच चर्चेत असतो. या शोमध्ये सहभागी होणारे अतरंगी स्पर्धक आपल्या विविध प्रकारच्या कारनाम्यांमुळे या शोची रंगत वाढवतात व चुरस निर्माण करतात. या शोमध्ये होणारी भांडणं व किस्से प्रत्येक सीझनला चर्चेत असतात.

बिग बॉसच्या या वर्षीच्या  सीजन मध्ये सुद्धा अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली मात्र या स्पर्धेचा जो निकाल लागला त्याने मात्र अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला व अनेकांना अपेक्षाभंगाचा धक्का बसला. या सीजन चा विजेता एम सी स्टॅन हा एक प्रसिद्ध रॅपर आहे मात्र तो या सिझनचा विजेता ठरेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा सलमान खानने विजेता म्हणून एम सी स्टॅन चे नाव घेतले तेव्हा सर्वत्र त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाची चर्चा सुरू झाली.

एम सी स्टॅन हा अवघा 23 वर्षांचा प्रसिद्ध रॅपर आहे. एमसी स्टॅन चे मूळ नाव अल्ताफ शेख आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय हालाखीच्या परिस्थितीत राहिलेल्या एमसी स्टॅनने आपल्या कलेच्या जोरावर प्रचंड पैसा कमावला व आज घडीला तो त्याच्या महागड्या वस्तूंच्या कलेक्शन मुळे नेहमीच चर्चेत राहतो. अगदी बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा त्याच्या ऐंशी हजाराच्या शूज व दीड कोटींच्या हिऱ्यांच्या नेकलेसची चर्चा रंगली होती व ही चर्चा सलमान खानने सुद्धा सेटवर केली.

एम सी स्टॅन ला गाण्याची आवड अगदी लहानपणापासूनच होती मात्र त्याचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या तितके सधन नव्हते. आई वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह जेमतेम चालवू शकत होते अशा परिस्थितीमध्ये वयाच्या बाराव्या वर्षी त्याने कव्वाली गायला सुरुवात केली त्यावेळी त्याला त्याच्या घरच्यांकडून व शेजाऱ्यांकडून विरोध सुद्धा झाला मात्र त्याने आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरवले.

यानंतर त्याने काही रॅप सॉंग बनवले जे प्रेक्षकांना चांगलेच भावले व खूप कमी कालावधीत तो एक यशस्वी रॅपर म्हणून नावारूपास आला. केवळ प्रसिद्धीच नव्हे तर रॅप ने त्याला पैसा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मिळवून दिला. सध्या त्याच्या एका शोचे मानधन लाखोंच्या घरामध्ये आहे.त्याने स्वतंत्रपणे तर रॅप सॉंग बनवले मात्र रफ्तार सोबत सुद्धा त्याने गायले आहे. वट्टा हे त्याचे गाणे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय ठरले आहे. आत्तापर्यंत या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.

एम सी स्टॅन हा बिग बॉसच्या घरामध्ये नेहमीच एक वेगळा स्पर्धक म्हणून पाहिला गेला. त्याने आपली ओळख कोणत्याही प्रकारे बदलण्याचा प्रयत्न या घरामध्ये केला नाही.त्याची भाषा, राहणी हे सर्वच त्याने त्याला आवडेल तसे ठेवले व कदाचित याच गोष्टीमुळे त्याच्या चाहत्यांना एका पारदर्शी स्पर्धकाची निवड बिग बॉस चा विजेता म्हणून करावीशी वाटली असेल यामध्ये नवल नाही.