Home » आरोग्यासाठी गुणकारी असणारी तुळस आणि तिचे आरोग्यदायी फायदे…
Health

आरोग्यासाठी गुणकारी असणारी तुळस आणि तिचे आरोग्यदायी फायदे…

हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व दिले जाते तसेच तुळशीला मंगलतेचे,पावित्र्याचे प्रतीक मानले जाते.हिंदू धर्मातील प्रत्येक घरासमोर तुलसी वृंदावन असते.अनेक जण नित्य नियमाने तुळशीची दररोज पूजा करतात.रोज सकाळी अंघोळ झाल्यावर घरासमोरील तुळशी वृंदावनात असणाऱ्या तुळशीची स्त्रिया पूजा करतात,प्रदक्षिणा घालतात आणि सायंकाळी तुळशी समोर दिवा लावून प्रार्थनाही केली जाते.तसेच वारकरी संप्रदायात देखील तुळशीला महत्वाचे स्थान आहे. तुळस ही वनस्पती आरोग्यासाठी अगदी गुणकारी आहे.

भारतीय संस्कृती मध्ये तुळशीला उच्च दर्जाचे स्थान आहे.तुळस भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय होती.तुळशीच्या मुळापाशी ब्रम्हदेव,मध्यभागी विष्णू आणि टोका जवळ शंकर यांचे वास्तव्य आहे असे पूर्वीपासून मानले जाते.तुळशीचा प्रत्येक भाग आरोग्यासाठी उपयोगी आहे.तुळशीमध्ये व्हिटॅमिन-अ,व्हिटॅमिन-सी,कॅल्शियम, क्लोरोफिल,जस्त आणि लोह अशी अनेक पोषकतत्वे आहेत.

रशियामध्ये केलेल्या संशोधनानुसार तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने लोकांमध्ये असणारा ताण तणाव,नैराश्य आणि चिंता यांचे प्रमाण कमी दिसून आले.घराच्या समोर तुळस असल्यास घरातील वातावरण शुद्ध आणि प्रसन्न राहते. 

तुळशीच्या रोपाची सर्वसाधारणपणे ३० ते १२० सें.मी येवढी उंची असते.तुळशीला येणाऱ्या तुऱ्याला मंजुळा असे म्हणतात.मंजुळा मध्ये असणाऱ्या बियांपासून तेल केले जाते.शास्त्रज्ञांच्या मते तुळशीचे रोपटे दिवसातून २० तास ऑक्सिजन  हवेत सोडत असते तर उरलेले ४ तास कार्बन डायऑक्साइड हवेत सोडते.ऑक्सिजन साठी तुळशीचे रोप अत्यंत फायदेशीर आहे.तुळशीच्या अनेक औषधी गुणधर्मामुळे तुळशीला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ असे देखील म्हटले जाते.

तुळशीच्या आजूबाजूचे वातावरण अगदी शुद्ध असते.तुळशी मध्ये असणाऱ्या घटकामुळे कीटक आणि जंतू यापासून शरीराचे रक्षण होते.आपण बघितले असेल कित्येक वेळा नैवेद्यावर तूळशीचे पान ठेवतात कारण तुळशीचे पान ठेवल्याने जंतू आणि कीटक दूर राहतात.तुळशीच्या रोपामुळे हवा शुद्ध राहते.    

तुळशीचा समावेश औषधी वनस्पती मध्ये होतो आणि आयुर्वेदामध्ये औषधी बनवण्यासाठी देखील होतो.तुळशीची पाने खाल्ल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते मानसिक दृष्ट्या व्यक्ती शक्तिशाली होते.तुळशीचे आरोग्याला खूप सारे फायदे आहेत ते जाणून घेऊया… 

१) तोंडाची दुर्गंधी : तोंडाची दुर्गंधी येत असेल तर तुळशीचे ४-५ पाने नित्यनियमाने चावून खावीत यामुळे तोंडातून दुर्गंधी येणार नाही.तोंडाला चव नसणे,तोंड कोरडे पडणे यावर देखील तुळशीची पाने खाणे उपयुक्त आहे तसेच तुळशीची पाने खाल्ल्याने मानसिक ताणतणाव कमी होतो आणि मन शांत होते. 

२) ताप आणि सर्दी-खोकला  : ताप आल्यावर तुळशीच्या पानाचा रस किंवा काढा करून पिल्यास ताप  कमी होतो.कच्ची पाने खाल्ली तरी देखील तापाचे प्रमाण कमी होईल.रोगप्रतिकारशक्ती आणि प्लेटलेट्स वाढवण्यासाठी देखील उपयोगी आहे.शरीरातील थकवा दूर करण्यासाठी देखील तुळस फायदेशीर आहे.तुळशीची पाने,अदरक आणि मध यांचे मिश्रण करुन खाल्ल्याने ताप या बरोबरच डोकेदुखी,सर्दी खोकला या सारख्या समस्या दूर होतात. 

 ३) त्वचारोग : त्वचेवर खाज येणे आणि आणखी काही त्वचेविषयी समस्या असतील तर यावर तुळशीची पाने उपयुक्त आहे.तुळशीची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्याने त्वचा उजळते आणि टवटवीत दिसते.चेहऱ्यावर असणारे काळे डाग कमी होण्यास मदत होते.तुळशीच्या पानात अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल तत्व असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी मदत होते आणि चेहरा उजळतो.तसेच आपण तुळशीच्या पानांचा लेप देखील लावू शकतो याने त्वचा उजळते.

४) दातांसाठी : दात दुखणे,दात किडणे,हिरड्या कमजोर होणे,दातांमधून रक्त येणे यासारख्या आजारांवर एक औषध म्हणून तुळशीचा उपयोग होतो.दररोज ४-५ तुळशीची पाने खावीत.आयुर्वेदानुसार दातांचे आरोग्य राखण्यासाठी तुळस अत्यंत गुणकारी आहे.

५) मधुमेह : मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुळशीमध्ये असणारे इगेनॉल द्रव्य उपयुक्त आहे.रोज सकाळी नियमित तुळशीची ४-५ पाने खावीत किंवा तुळशीच्या पानांचा रस करून पिल्याने मधुमेह नियंत्रणात येतो.तुळशीचा काढा घेतल्याने साखर नियंत्रणात राहते. 

६) कॅन्सर : कॅन्सर हा सर्वात भयंकर आजार पण यावर देखील काही आयुर्वेदिक उपाय आहे.तुळशी मध्ये युजेनॉल कम्पाऊंड हा घटक  असल्यामुळे कॅन्सर वर मात करण्यासाठी तुळस उपयुक्त ठरते.रोज सकाळी ४-५ तुळशीची पाने खाल्ल्याने कॅन्सर होण्याची संभावना कमी असते. याच बरोबर इन्फेक्शन,आळस,लठ्ठपणा अशा अनेक त्रासांवर तुळस उपयुक्त ठरते.तुळशी मध्ये असणारे फायटो केमिकल यामुळे कॅन्सर चा धोका टाळता येतो. 

७) भूक न लागणे : जेवण करण्यापूर्वी तुळशीची ९-१० पाने खावीत यामुळे भूक लागेल आणि अन्न पचन होण्यासाठी देखील तुळस उपयुक्त आहे.जेवताना भातावर तुळशीची पाने ठेवतात हि परंपरा आहे यामागील कारण म्हणजे तुळस अन्न पचण्यास मदत करते.अपचन होत असल्यास तुळशीची पाने उपयोगी ठरतात.